तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर नोंदविला आक्षेप
। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटद्वारे राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवत, या यंत्रणांना मोंदीचा वेताळ असल्याची बतावणी केली आहे. याशिवाय, मोदींचा हा वेताळ फक्त विरोधकांच्या खांद्यावर बसतो, असा टोला लगावण्यात आला आहे.
मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. काँग्रेसकडून या मुद्द्यावर तीव्र आक्षेप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकताच शिवसेना खा. संजय राऊत यांचे बंधू आणि व्यावसायिक प्रविण राऊत यांना ईडीने अटक केली असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
यासाठी विक्रम आणि वेताळच्या गोष्टीचा संदर्भ घेत त्यातील उपमा केंद्रीय तपास यंत्रणांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी यासंदर्भात केलेले एक ट्वीट सध्या तुफान व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’ कथांमधीलच्या वेताळासारख्या आहेत. फरक हाच की विक्रम बोलला तर वेताळ खांद्यावरून उडून जायचा. मोदींचा वेताळ, मोदी सरकारच्या विरोधात बोलले की, बोलणार्याच्या खांद्यावर बसतो, असे उपरोधिक घणाघात सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटद्वारे केला आहे.
दरम्यान, मोदींचा वेताळ एचडीआयएलच्या खांद्यावर बसणार नाही, असा खोचक टोला देखील सावंत यांनी या ट्वीटमध्ये लगावला आहे. संजय राऊत मोदी सरकार विरोधात बोलले. भावाला लगेच अटक! 1 जाने 2021 रोजी प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त केली. मग तपास वर्षभर का लटकवला? याच एचडीआयएलने भाजपला 20 कोटींची देणगी दिली. त्यांच्या खांद्यावर बसणार नाही, असे ट्वीटमध्ये सावंत यांनी म्हटले आहे.
गोरेगावमधील पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली इडीने संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत यांना अटक केली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता 9 फेब्रुवारीपर्यंत त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
ट्विट मधील ट्विस्ट
‘तू बोला मैं चला, नव्हे तू बोला मैं आया! भाजपा नेत्यांचा खांदा याला चालत नाही. वर्षानुवर्षे तो वेताळ झाडाला लटके. या वेताळाचा तपासही लटकलेला राहतो, असेही सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.