मोहाची फळे बाजारात दाखल

स्थानिक पातळीवर विक्री, खरेदीसाठी खवय्यांच्या उडया

| पाली/गोमाशी |प्रतिनिधी |

समृद्ध नैसर्गिक ठेवा लाभलेल्या जिल्ह्यात विविध प्रकारची झाडे आणि वनस्पती आहेत. यातील रानभाज्या व विवीध फळांची भाजी त्या-त्या हंगामात अधिक लोकप्रिय आहेत. सध्या मोहाची फळे बाजारात विक्रीसाठी आलेली आहेत. मोहाच्या फळापासून रुचकर व स्वादिष्ट भाजी बनवली जाते. त्यामूळे हि फळे खरेदी करण्यासाठी खवय्यांच्या उडया पडत आहेत. आदिवासींना देखिल हि फळे विकुन चार पैसे हाती येत आहेत.

सध्या 20 रुपये वाटा मिळत आहे. यामध्ये 20 ते 25 मोहाची फळे असतात. मोहाच्या झाडाला आदिवासी लोक कल्पवृक्ष मानतात. या वृक्षाचे मूळ स्थान भारत आहे. मोहाला वसंत ऋतूत फुले लागतात. पानझडी वनस्पतींमध्ये वृक्षवर्गात याचा समावेश होतो. हा वृक्ष पर्णझडी मिश्र जंगलामध्ये नद्या-नाल्यांचे काठ, शेताचे बांध इ. ठिकाणी आढळतो. राज्यात ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रायगड, विदर्भ इत्यादी ठिकाणी मोहाची झाडे आढळून येतात. जिल्ह्यात आदिवासी लोक उन्हाळ्यात येथील मोहाची फळे व त्यांच्या बिया गोळा करून त्याची स्थानिक पातळीवर विक्री करतात. स्थानिक लोकांना मोहाच्या फळाची भाजी खूप आवडते. नव्या हंगामातील उपयुक्त भाजी म्हणून लोक आवर्जुन मोहाच्या फळाची भाजी करतात. मोहाच्या बियांमध्ये सुमारे 45 ते 50 टक्के खाद्य तेल आणि 16 टक्के प्रथिने आहेत. तेलाचा उपयोग त्वचारोगावरील औषधे, साबण निर्मिती म्हणून होतो. या वृक्षाचे फायदे पाहता यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

रुचकर व स्वादिष्ट भाजी

गडद हिरव्या कच्च्या मोहाच्या फळाची भाजी बनवली जाते. फळाला स्वच्छ धुवून आतील बी काढून बारिक चिरून घ्यावे. त्यानंतर कढईत किंवा तव्यात तेल टाकून कांदा, लसुन व मिरची वर परतुन घ्यावे आणि वर झाकण ठेवावे. चव वाढविण्यासाठी ओले खोबरे किंवा वाटण देखिल टाकू शकता. तसेच फळ चिरुन ते आंबोशी सारखे उन्हात वाळून देखिल ठेवले जाते. मग पावसाळयात फळाची भाजी केली जाते. अशा प्रकारे मोहाची रुचकर व स्वादिष्ट भाजीची चव जिभेवर रेंगाळत राहते.

शास्त्रीय माहिती –

1) कुळ – सॅपोटॅसी
2) शास्त्रीय नाव – मधुका इंडिका आणि मधुका लॉन्जिफोलिया.
3) मोहाचे झाड हे द्विदल प्रकारातील आहे. झाड अतिशय जलद गतीने वाढते. झाडाची उंची साधारण 15 ते 20 मीटर असते. घेरही मोठा असतो.
4) झाडाची मुळे जमिनीत खोलवर जातात. खोड मजबूत व टणक असते. पाने लंबगोलाकार, फांदीच्या शेंड्याला गुच्छाने फुले येतात.
5) झाडाला 8 ते 12 वर्षांनंतर फळे यायला सुरवात होते. फुले येण्याचा कालावधी फेब्रुवारी ते एप्रिल महिना आणि फळे येण्याचा कालावधी एप्रिल ते जून महिना असा आहे.

फळांचा उपयोग

  1. फळांचा भाजीसाठी अधिक प्रमाणात उपयोग करतात.
  2. पक्षी व वटवाघळांचे आवडीचे खाद्य.
  3. फळांचा उपयोग शिकेकाई बरोबर केस धुण्यासाठी.
  4. फळे शुक्रवर्धक, बल्य आणि शीतल आहे.
Exit mobile version