। सुधागड -पाली । गौसखान पठाण ।
पावसाळा सुरू झाला की हमखास मिळणारे रानफळ म्हणजे अळू. सध्या जिल्ह्यातील बाजारात अळू विक्रीसाठी आले आहेत. मात्र मागीलवर्षी 10 रुपयांना मिळणारा 5 अळू असलेला एक वाटा यावर्षी 20 रुपयांना मिळत आहे. तरीही खवय्ये खरेदी करतांना दिसत आहेत.

आदिवासी महिला ही अळूची फळे विक्रीसाठी घेऊन येतात. साधारण पाऊस पडण्याआधी ही फळे तयार होतात व पावसाळा सुरू झाला की विक्रीसाठी येतात. फक्त याच हंगामात मिळणारी चॉकलेटी रंगांची, गोल आकाराची आवळ्या एवढी ही आंबट गोड फळे अनेकांना आवडतात. त्यामुळे आवर्जून त्याची खरेदी केली जाते. पावसाचा जोर वाढला की यामध्ये कीड पडून फळे खराब होतात. त्यानंतर थेट पुढील वर्षी येतात. त्यामुळे आता महाग मिळणारी फळे खवय्ये आवर्जून खरेदी करतात.
रानात अळूची झाडे कमी झाली आहेत. तसेच या फळांच्या झाडाची लागवड कोणी करत नाही. त्यामुळे आवक कमी आहे. महागाई देखील वाढली आहे. त्यामुळे अळूच्या किंमती वाढल्या आहेत. तरी देखील खवय्ये खरेदी करतात.
– पार्वती पवार, विक्रेती