। मुंबई । प्रतिनिधी ।
भारत सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत जे अग्नीवीर सैन्यात भरती होतील त्यांचं चार वर्षं सतत मूल्यांकन केलं जाईल. त्यानंतरच त्यातून कायमस्वरूपी सैनिक म्हणून निवड झालेल्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. आर्मी स्टाफचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजूयांनी न्यूज18 शी बोलताना ही माहिती दिली. अग्निवीरांमधून चार वर्षांनंतर कायमस्वरूपी सैन्यात भरती होण्यासाठी 25 टक्के जवानांची निवड करण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अपारदर्शकता होणार नाही, याबाबत राजू यांनी खात्री दिली.
“चार वर्षांनंतर एका अग्निवीराला याबाबतची खात्री असायला हवी की तो एका पारदर्शक पद्धतीतून गेला आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक सेवांमध्ये भरती होणाऱ्यांची चाचणी करण्यासाठी विशिष्ट तरतुदी केल्या आहेत. ही मूल्यांकन प्रक्रिया चार वर्षं सतत सुरू राहील.”, असं त्यांनी स्पष्ट केलं. अग्निवीरांमधून कायमस्वरूपी भरती करण्याची निवड प्रक्रिया ही वस्तुनिष्ठ असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा होणार नाही हे लष्कर सुनिश्चित करेल. अग्निवीरांची पहिली मूल्यांकन चाचणी ही सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर होईल. त्यानंतर प्रत्येक वर्षाच्या शेवटी फिजिकल फिटनेस, फायरिंग स्कील्स आणि इतर कवायती अशा विविध चाचण्यांच्या आधारे त्यांचं मूल्यांकन केलं जाईल. काही सब्जेक्टिव चाचण्याही असतील, ज्यामध्ये अॅटिट्यूड आणि अॅप्टिट्यूड चाचण्यांचा समावेश होईल. आपल प्लॅटून कमांडर, कंपनी कमांडर आणि कमांडिंग ऑफिसर यांसोबतचा त्याचा व्यवहार, संवाद कसा आहे हे देखील पाहिलं जाईल. वर्षाच्या शेवटी या सर्व चाचण्यांमधून मिळालेला डेटा सिस्टीमवर अपलोड केला जाईल. त्यानंतर या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप होणार नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या शेवटीही हीच प्रक्रिया राबवली जाईल. चौथ्या वर्षाच्या शेवटी हा सर्व डेटा एकत्र केला जाईल, आणि त्यातून मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. यामुळे आम्हालाही सर्वांत उत्तम जवान निवडल्याचा आत्मविश्वास मिळेल; असं लेफ्टनंट जनरल राजू यांनी स्पष्ट केलं.
चार वर्षांचं प्रशिक्षण पुरेसं
अग्निवीरांच्या प्रशिक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, की चार वर्षांचा कालावधी हा भरपूर आहे. सुरुवातीला त्यांना सहा महिन्यांचं खडतर प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर गरजेनुसार, त्या-त्या सैनिकाचं कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने बटालियन कमांडरकडून विशेष प्रशिक्षण दिलं जाईल. एका अग्निवीराला एवढं प्रशिक्षण नक्कीच दिलं जाईल, की गरज पडल्यास उद्या तो युद्धात उतरण्यासाठी सज्ज असेल. चार वर्षांनंतर आपलं स्कील वाढवून एक अग्निवीर नक्कीच प्रशिक्षकदेखील होऊ शकतो.