| मुंबई | प्रतिनिधी |
बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची पुनरावृत्ती कांदिवलीत घडली आहे. एका 11 वर्षीय शाळकरी मुलाची शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने स्वच्छतागृहात अश्लील चित्रफित तयार करून त्याचा लैंगिक छळ केला आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडित मुलगा 11 वर्षांचा असून, कांदिवली पूर्वेच्या एका शाळेत शिकतो. गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तो शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात गेला होता. त्यावेळी शाळेचा 30 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने मुलाचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. याबाबत कुणाला सांगू नये अशी दमदाटी करत अश्लील शब्दात शिविगाळ केली. याबाबत मुलाने घरी येऊन हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलाच्या आईने याबाबत समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आम्ही आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांनी दिली.
या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील शाळेत दोन चिमकुल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले होते. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळांमध्ये उपाययोजना करम्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, पॅनिक बटण, महिला सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, हेल्पलाईन सुरू करणे आदी विविध उपायांची अमंलबजावणी करण्यास सांगितले होते. मात्र, कांदिवलीच्या या घटनेमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजना किती कमकुवत होत्या हे दिसून आले आहे.