| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षातील विविध आघाडीच्या पदाधिकारी, सदस्यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या निवडीनंतर प्रत्येकाची जबाबदारी अधिक वाढली आहे. तळागाळातील घटकांपर्यंत पोहचून प्रत्येकाने जबाबदारीने काम करायचे आहे, असे प्रतिपादन शेकाप राज्य मिडीया सेल अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा, तालुका, महिला आघाडी, विविध आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम शेकाप भवन येथील सभागृहात (दि.5) करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप जगे यांनी केले.

यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, नरेश म्हात्रे, नंदकूमार मयेकर, ॲड. विजय पेढवी, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळी विकास कामे करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या संस्था उभारून अनेकांना रोजगाराचे दालन उभे केले आहे. जनतेच्या हिताची कामे ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच झाली आहेत. त्यामुळे कितीही वादळे आली, तरीही शेतकरी कामगार पक्ष कधीही डगमगणारा पक्ष नाही. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. प्रत्येकाला वेगवेगळ्या आघाडींमध्ये पदे देऊन आपले नेते जयंत पाटील यांनी संधी दिली आहे. त्या संधीचे सोने करून दाखविण्याची वेळ आली आहे. प्रत्येक आघाडीने अजेंठा घेऊन कामाला लागले पाहिजे. सांस्कृतिक, क्रीडा, अशा सर्वच क्षेत्रातील घटकांपर्यंत पोहचून पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगायची आहेत.आगामी काळात निवडणूका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या निवडणूकांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकून लाल बावटा फडकविण्यासाठी कामाला लागा, असे चित्रलेखा पाटील यांनी आवाहन केले.
पदाधिकारी, सदस्यांना नियुक्ती पत्र वाटप
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा सहचिटणीसपदी ॲड. गौतम पाटील, जिल्हा कार्यालयीन चिटणीसपदी अजय झुंजारराव, पदसिध्द सदस्यपदी सुप्रिया पाटील, शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, ॲड मानसी म्हात्रे, प्रदिप नाईक यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच जिल्हा परिषद गट, शेतकरी सभा, शेती मजूर आघाडी, महामार्ग बाधित शेतकरी, कामगार आघाडी, पुरोगामी शिक्षक शिक्षकेत्तर आघाडी, मच्छीमार, सोशल मिडीया, विद्यार्थी संघटना, क्रीडा, अनुसुचित जमाती, व्यापारी सेल, आपत्कालीन कार्य वैद्यकिय सेवा सेल, महिला आघाडी, तालुका चिटणीस, विभागीय चिटणीस, पुरोगामी युवक संघटना, तालुका अधिवक्ता, अल्पसंख्याक आघाडी, सांस्कृतिक कला सेल,तसेच अलिबाग शहर प्रमुखसह वेगवेगळ्या सेलच्या पदाधिकारी व सदस्यांना नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.