महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती
| मुंबई | प्रतिनिधी |
मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या विजयासाठी असलेला आवाज मराठीचा हा विजयी मेळावा शनिवारी (दि.5) अखेर वरळी डोम येथे पार पडला. या मेळाव्यासाठी तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसैनिक तसेच मनसे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पहायला मिळाला.
या मेळाव्यात महाविकास आघाडीतील रा.कॉ. शरद पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, शिवसेनेचे युवानेते आ. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, कॉ. अजित नवले तसेच शिवसेना (ठाकरे गट), मनसेचे कार्यकर्ते व अन्य पक्षाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात कोणताही झेंडा नाही तर फक्त मराठी हा एकच अजेंडा आहे. अगोदरच सांगिल्याप्रमाणे हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केले. यापुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, 20 वर्षांनी आम्ही एका व्यासपीठावर एकत्र येत आहोत. आम्हाला एकत्र आणणं माननीय बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. या त्यांच्या विधानावर अखंड सभागृहात हास्यकल्लोळ पसरला.
सरकारच्या मनमर्जीच्या कारभारावर देखील त्यांनी भाष्य केले. तसेच तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर, असेही त्यांनी ठणकावले. तसेच हिंदी सक्तीविरोधात बोलताना त्यांनी भाषा कोणतीही श्रेष्ठच असते. एक भाषा उभी करायला प्रचंड तपश्चर्या लागते. लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अश्याच उभ्या राहत नसतात. त्याबद्दलही आदर व्यक्त केला. पुढे त्यांनी जनतेला इशारा दिला, महाराष्ट्राला प्रत्येक मराठी माणूस आज मराठी म्हणून एकत्र आला. याचं पुढचं राजकारण तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार. मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत. हे जातीपातींमध्ये विभागायला सुरुवात करतील.
मराठी भाषेसाठी तडजोड नाहीच
युती, आघाड्या सर्व गोष्टी होत राहतील. पण महाराष्ट्र, मराठी, मराठी माणूस, मराठी भाषा यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थिती होणार नाही. यापुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं देखील गरजेचं आहे आणि सतर्क असणं देखील तितकंच गरजेचं आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
म महापालिकेचाच नाही महाराष्ट्राचाही आहे
प्रत्येक वेळी काही झालं की भांडणं लावायची. आम्ही एकत्र येणार, निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? काहीजण म्हणतात यांचा म महापालिकेचा आहे. नुसता महापालिकेचा नाही तर आमचा म महाराष्ट्राचा आहे. आमची सत्ताही आम्ही काबीज करुन दाखवू असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. बटेंगे तो कटेंगे म्हटलं होतं तेव्हा वाटलं की हिंदू आणि मुस्लिम करत आहेत. मराठा आणि मराठेतर असा वाद लावून दिला होता. आपण काय यांच्या पालख्यांचे भोई होणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
भाजपावाल्यांना लग्नाला बोलवू नका-उद्धव ठाकरे
मी नेहमी सांगतो कुणाच्याही लग्नात भाजपावाल्या बोलवू नका, येतील मस्त बासुंदी, श्रीखंड पोळ्या बिळ्या खातील. नवरा बायकोमध्ये भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. एवढं केलं तरी ठीक नाहीतर त्या पोरीलाच पळवून घेऊन जातील. यांचं स्वतःचं असं काहीच नाहीये. कोणत्याही लढ्यात भाजप कधीही नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपा शेवटी आला, त्यानंतर जनसंघ लगेचच बाहेर पडला. यांच्याकडून आम्ही देशाभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा का? या सगळं विकून टाका हे त्यांचं धोरण आहे. मुंबईच्या चिंधड्या उडवत आहेत. आजची मुंबई कुणाच्या घशात घालत आहेत? आपण काय बघत बसायचं का? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
मराठी म्हणजे महाराष्ट्राची मातृभाषा आहे. महाराष्ट्राच्या मातृभाषेवर अतिक्रमण करण्याचा राज्यकर्ते जो प्रयत्न करीत आहेत. त्याविरोधात सडेतोड उत्तर देण्यासाठी हा मराठी भाषिकांचा जनसमुदाय मेळाव्यात जमा झाला. महाराष्ट्रात राहणारा मराठी आणि त्याची मातृभाषा मराठी असे समीकरण आहे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ते एकत्रच राहणार आहेत. निवडणुकीच्या मुद्द्यावर कोणतेही भाष्य करणे आज चुकीचे आहे. आज मराठीसाठी येथे आलो आहोत. हिंदीला आमचा विरोध नाही. हिंदीची सक्ती करण्याला आमचा विरोध आहे. नरेंद्र जाधव समिती नेमणे हि केवळ फसवणूक आहे. या समितीला काहीही अर्थ नाही. हिंदी सक्तीविरोधात अधिवेशनात राज्यकर्त्यांना विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने नरेंद्र जाधव समिती नेमण्याची पळवाट राज्यकर्त्यांनी शोधली आहे.
जयंत पाटील,
सरचिटणीस, शेकाप