ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येत केले एकजुटीचे प्रदर्शन
। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेला. तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहणार’, अशी मोठी घोषणा केली. त्यामुळे ठाकरे बंधूंची एकजूट आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचे प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला. तसेच, यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता. परंतु, आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षांनंतर मी आणि राज एका राजकीय व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची गरज नाही, आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहणार, असं त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच, आम्हाला वापरायचे आणि फेकून द्यायचे, असे सत्ताधाऱ्यांचे धोरण होते. परंतु, आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत आणि यांना फेकून देण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
ठाकरे बंधूंच्या या एकजुटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ही एकजूट सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.