पनवेल व वाशी परिसरातून सहा जणांना अटक
| पनवेल | वार्ताहर |
पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ हत्या मुख्य आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी पनवेल तसेच वाशी येथून पकडले आहे. मुन्ना पोळेकर हा फक्त मोहरा होता हे समोर आलं आहे. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड रामदास मारणे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पनवेल पोलिसांनी पनवेल येथील एका हॉटेलवर छापा टाकून या गुन्ह्यातील तीन आरोपींना मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहिती व फोन नंबरच्या आधारे इतर मुख्य तीन आरोपी हे वाशी येथील एका बारमध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून इतर तीन आरोपींनासुद्धा ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्यांनी वापरत असलेल्या दोन महागड्या गाड्या पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीसह पुणे पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द केल्या आहेत.
5 जानेवारीला दिवसाढवळ्या झालेल्या शरद मोहोळ याच्या हत्येने पुणे हादरून गेलं होतं. पोलिसांनी गोळ्या घालणाऱ्या आरोपींना पकडलं खरं; पण या हत्येमागचे खरा मास्टरमाईंड वेगळा कोणतरी असावा, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी अखेर मुख्य मास्टरमाईंडला पकडलं असून, शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारची मुख्य भूमिका असल्याचे समजतेय.
मोहोळ खूनप्रकरणी पुणे पोलिसांनी रविवार, दि.15 रोजी मोठी कारवाई केली आहे. शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलारसह 11 जणांना ताब्यात घेतले. मागील 2 दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते. मात्र, ते पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशीदरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली. गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी 13 जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन वकिलांचादेखील समावेश आहे.