मोहोपाडा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; वाहनचालकांची कसरत

बांधकाम विभागाची तात्पुरती मलमपट्टी

| रसायनी | वार्ताहर |

दांड-रसायनी मोहोपाडा रस्त्यावरील मोहोपाडा हद्दीतील मुख्य रस्त्यावरील बँक ऑफ इंडिया ते स्टेट बँक ऑफ इंडिया या रस्त्याला खड्डे पडल्याने वाहनांचे अपघात होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. गेली कित्येक वर्षे अनेकांनी हा रस्ता व्हावा यासाठी आवाज उठविला. शिवाय, परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था व खालापूर तालुका पत्रकार संघाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले असता लवकरच काम करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यावेळी तात्पुरती मलमपट्टी करून खड्डे बुजविले; परंतु पावसाळा सुरू होताच रस्त्याची दुरवस्था होऊन रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत.

जनता शाळेजवळील वळण बँक ऑफ इंडिया ते स्टेट बँक या रस्त्याला मोठ मोठे खड्डे असल्याकारणाने दुचाकी वाहकांचे अपघात होत असतात. मागील काही दिवसांत चार ते पाच किरकोळ अपघात घडले असले तरी भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन प्रवाशांसाठी या रस्त्यावरील खड्डा म्हणजे मृत्यूच द्वारच आहे. शिवाय, रसायनी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी बरीचशी अवजड वाहने याच रस्त्याचा वापर करतात. रस्त्यालगत आजूबाजूला झाडे झुडुपांचे प्रमाण जास्त आहे. शिवाय या रस्त्यावरील साईडपट्टीचा अभाव यामुळे अपघातात अधिकच भर पडणार असल्याने या रस्त्याचे काम न झाल्यास स्थानिकांसह पत्रकार आंदोलन करतील, असा इशारा पत्रकार राकेश खराडे यांनी दिला आहे.

Exit mobile version