बुरशी लागलेली रसमलाई विक्रीला

कामोठ्यात मिठाई दुकानदाराचा संतापजनक प्रकार; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात मिठाई आणि खाद्यपदार्थांची खरेदी करत असताना कामोठे सेक्टर-25 येथील बिकानेरच्या दुकानात बुरशी लागलेली रसमलाई विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकांच्या ताटात खराब खाद्यपदार्थ पोहोचत असतील, तर हा केवळ दुकानदाराचा निष्काळजीपणा नसून, सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याने संताप व्यक्त होत आहे.

अक्षय देवकर यांनी संबंधित दुकानातून रसमलाई खरेदी केली होती. मात्र, घरी आणल्यानंतर रसमलाई खराब झाल्याचे आणि त्यावर चक्क बुरशी लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ दुकान मालकाला याची माहिती दिली. त्यानंतर दुकानमालकाने रसमलाई खराब असल्याचे मान्य करत अक्षय देवकर यांची माफी मागितली.

या प्रकाराची माहिती समोर येताच उपस्थित नागरिकांनीही संताप व्यक्त केला. गणेशोत्सवासारख्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होत असताना खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असेल, तर नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अन्नसुरक्षा विभागाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित दुकानाची अचानक तपासणी करावी, रसमलाईसह अन्य खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. माफी मागून प्रकरण संपवण्याऐवजी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची अधिकृत तपासणी होणे गरजेचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Exit mobile version