अलिबागमधील तरुणीचा विनयभंग; जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा

मयुर महाडिकसह धमकी देणार्‍या पत्नीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील समाधान हॉटेल शेजारील श्रीराम गार्डन बिल्डिंगमधील मयुर महाडिक याने 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही बाब त्याच्या घरी सांगण्यासाठी गेलेल्या पिडितेला मयुरच्या पत्नीने धमकावल्याने त्यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकिय कार्यालयात कर्मचार्‍यांमध्ये कुजबूज सुरु असल्याचे समोर आले आहे.

दिलेल्या तक्रारीनूसार, अलिबागमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असलेली पिडित मुलगी आरोपी मयुर महाडिक राहत असलेल्या बिल्डिंगमध्येच राहत असून गुरुवारी (दि.10) त्याने बिल्डिंगच्या जिन्यामध्ये तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिचे आई-वडील नवी मुंबईत राहत असून ती मैत्रिणीसमवेत शिक्षणानिमित्त अलिबागमध्ये राहते. त्याचाच फायदा घेत त्यांनी पिडितेसोबत गैरव्यवहार केला.

पिडित मुलीने दिलेल्या तक्रारीत दोन वर्षापूर्वी मैत्रिणीमुळे मयुर महाडिक याच्यासोबत ओळख झाल्याचे तिने सांगितले. तसेच गुरुवारी मित्राच्या घराची चावी देण्यासाठी ती बिल्डिंगच्या खाली गेली होती. यावेळी परत घरी येत असताना जिन्यामध्ये मयुरने तिच्यासोबत गैरव्यवहार केला. त्यामुळे घाबरलेल्या पिडितेने झाला प्रकार मैत्रिणीला सांगितला.

त्यानूसार जाब विचारण्यासाठी तसेच आरोपीच्या पत्नीला सांगण्यासाठी त्या आरोपीच्या घरी गेल्या. त्यावेळी पत्नीने ही बाब कोणासही न सांगण्यास सांगितले. तसेच त्यांची बाजू न ऐकता आरोपीच्या पत्नीने मुलींना धमकावले. आमचे खुप नातेवाईक अलिबागमध्ये राहतात. ते सर्व डेंजर आहेत. ते लगेच इथे येतील, अशी धमकी दिली. त्यामुळे पिडित मुलीने तिच्या आई-वडिलांना याबाबत कळविले. दरम्यान, आई-वडिलांनी अलिबागला येऊन आरोपीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढिल तपास सुरु आहे.

Exit mobile version