| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्प हाती घेण्यात आले असून, परिसराच्या औद्योगिक प्रगतीला आता अधिक वेग मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
एम आई डी सी मार्फत तळोजा औद्योगिक क्षेत्रात सुमारे 200 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण, ड्रेनेज व्यवस्था सुधारणा तसेच स्टॉर्म वॉटर लाईन उभारणीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे औद्योगिक वाहतुकीतील अडथळे कमी होऊन लॉजिस्टिक्स व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, तळोजा परिसरात भविष्यात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर पार्क उभारण्याची योजना असून, यामुळे आयटी व डिजिटल क्षेत्रातील गुंतवणूक वाढून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, तळोजा परिसरात खासगी स्तरावर लॉजिस्टिक्स व वेअर हाउसिंग प्रकल्प विकसित होत असून, जवाहरलाल नेहरू बंदर, नवी मुंबई मेट्रो आणि महामार्गांच्या जवळीकतेमुळे हा परिसर लॉजिस्टिक हब म्हणून वेगाने विकसित होत आहे.
कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने मोरबे-कलंबोली मार्गाच्या उभारणीमुळे औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, नवी मुंबई मेट्रो प्रकल्पामुळे कामगार व कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय, लवकरच कार्यान्वित होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसराला आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडणी मिळणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही एमआईडीसीकडून कासाडी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पावले उचलली जात असून, औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकूणच, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि नव्या औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक वसाहत ही भविष्यात महत्त्वाचे औद्योगिक व लॉजिस्टिक केंद्र म्हणून विकसित होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.






