। नेरळ । वार्ताहर ।
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत रेल्वे स्थानकात सध्या जंगलातील वानरांचा वावर दिसून येत आहे. मात्र, स्थानकात फिरणारी वानरे ही जंगलातील नसून, डोंबारीचा खेळ करणारे यांनी सोडलेली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकात ही वानरे फिरत असल्याने प्रवासी यांच्यात घबराट पसरली आहे.
कर्जत रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला जंगल भाग असल्याने यापूर्वीदेखील कर्जत शहरात आणि रेल्वे स्थानकात वानरे आणि माकडे यांचा वावर राहील होता. मात्र, गेली काही दिवस कर्जत रेल्वे स्थानकात वावरत असलेले हे वानर प्रवाशांवर थेट हल्ला करू शकतात. नेरळ जवळील जुम्मापट्टी येथील जिल्हा परिषद शाळेत घुसून सात वर्षाच्या मुलीवर त्या ठिकाणी पिसाळलेल्या वानरांनी हल्ला केला होता. त्यावेळी त्या लहान मुलीला थेट कल्याण येथील रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर मुंबई येथून प्राणी पकडणारे यांना बोलावून पिसाळलेली माकडे यांना पकडावी लागली होती. तर दुसरीकडे माथेरानच्या जंगलातील असंख्य वानरे खाली लोकवस्तीत येत होते आणि त्यामुळे वानरांचा त्रास हा नवीन नाही.परंतु, डोंबारीचा खेळ करणार्या वानरांनी दिलेला त्रास त्रास घेता कर्जत रेल्वे स्थानकात असलेल्या वानरांकडून हल्ले होण्याची शक्यता निर्मण झाली आहे.
कर्जत रेल्वे स्थानकातील प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. कर्जत रेल्वे प्रशासनाने पिसाळलेली माकडे पकडणारी टीम ची माहिती घेऊन वन विभागाच्या मध्यातून त्या माकडांचा रेस्क्यू करावा, अशी सूचना कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.







