| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत हद्दीत माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पालीकर अक्षरशः माकडांमुळे हैराण झाले असून, त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय निर्माण झाला आहे. ही माकडे गॅलरीमधील कुंड्यांमध्ये हात घालून झाडांची नासधूस करतात. खिडक्यांमधून घरात प्रवेश करून अन्नधान्याची नासाडी करतात. तसेच, टेरेसवर ठेवलेले कपडे ओढून फेकतात, फाडतात. रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांवर उड्या मारतात. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात वन विभागाकडे अनेक वेळा निवेदने व तक्रारी दाखल करण्यात आल्या असूनही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. नागरिकांचा प्रश्न कायम असून, याचा प्रशासकीय दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवत आहे. माकडांचा उपद्रव केवळ त्रासदायकच नव्हे, तर आकस्मिक अपघात, शारीरिक दुखापत आणि आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीची उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी पालीकरांकडून होत आहे.







