पोट भाडेकरु ठेवून कमाई
। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायतीच्या गाळ्यांवर सध्या भाडेकरुंची मक्तेदारी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नगरपंचायतीने गाळेधारकांना भाडे तत्वावर गाळे दिले आहेत. त्यातील काही भाडोत्री हे पोट भाडेकरू ठेवून आयती कमाई करीत आहेत.
बाजारपेठेत नगरपंचायतीच्या मालकीचे एकूण 36 गाळे आहेत. त्यातील 35 गाळे सुरू असून, एक बंद गाळा नगरपंचायतीच्या ताब्यात आहे. या गाळ्यांना भाडे माफक स्वरूपाचे असूनही गाळेधारकांकडून ते वेळी भरले जात नाहीत. यासाठी नगरपंचायतीकडून गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली असून अद्यापही दुकान गाळ्यांचे सात लाख 16 हजार पाचशे रुपये भाडे थकीत आहे. भुईभाडे दोन लाख 79 हजार एकशे पाच रुपये थकीत असून, एकूण नऊ लाख 95 हजार सहाशे पाच रुपये नगरपंचायतीला भाडे येणे बाकी आहे. या गाळ्यांचे भाडे करार झालेले नाहीत. मात्र, जो करारनामा झाला आहे, त्या करारनाम्यात पोटभाडोत्री ठेवू नये, असा नियम लागू करण्यात आला आहे. तरीही काही गाळेधारकांकडून त्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
व्यवसाय करण्यासाठी मिळालेल्या गाळ्यात पोट भाडेकरू ठेऊन त्यांच्याकडून पैसे कमाविले जात आहेत. नगरपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे गाळेधारकांकडून असेच पोट भाडेकरू ठेऊन पैसे कमविले जात असूप नगरपंचायतीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत नगरसेविका नेहा पांढरकामे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून असे प्रकार घडत असल्याचा आरोप करीत नगरपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
तळा नगरपंचायत गाळ्यांचे भाडे मूल्यांकन होण्यासाठी सहाय्यक संचालक नगररचना अलिबाग यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आले आहे. मूल्यांकन प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच ज्या गाळेधारकांनी पोट भाडेकरू ठेवला आहे. अशांना नगरपंचायतीकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.
धीरज चव्हाण, प्रभारी मुख्याधिकारी, तळा नगरपंचायत