। मुंबई । प्रतिनिधी ।
उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. मान्सूनने अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराचाकाही भाग व्यापला असून, श्री विजय पुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
यंदाचा नैऋत्य मान्सून निर्धारित वेळेच्या आधीच अंदमान-निकोबार बेटांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे केरळमध्येही मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण आठवडाभरात तो महाराष्ट्रात पोहोचतो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणासह मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा केली जात होती. अखेर तो अंदमानात दाखल झाला आहे. अंदमानात मान्सूनच्या आगमनाने त्या प्रतीक्षेला आशेची नवी किनार मिळाली असून शेतकरी वर्गामध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेषतः पाण्याअभावी चिंतेत असलेल्या ग्रामीण भागाला मान्सून मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
दिलासादायक बातमी! मान्सून अंदमानात दाखल
