ग्रामीण अर्थकारणाला बसतोय फटका
। रायगड । प्रतिनिधी ।
पावसाळ्यात वर्षासहलीदरम्यान पर्यटकांच्या होणार्या मृत्यूची दखल घेऊन, जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर वर्षासहलींना बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. स्थानिकांचा रोजगार बुडणार असल्याने योग्य खबरदारी घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.एकूणच, पावसाळी पर्यटनावर आणलेल्या बंदीने ग्रामीण अर्थकारणाला फटका बसला आहे.
सहलीसाठी येणारे पर्यटक दगावण्याच्या घटना नवीन नाहीत. गेल्या दोन वर्षांत 35 हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात प्रामुख्याने कर्जत, खोपोली, मुरुड आणि माणगाव पावसाळी पर्यटन केंद्रांचा समावेश आहे. या दुर्घटनांना पर्यटकांचा आततायीपणा कारणीभूत ठरतो आहे. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परीस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटक यास कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्यात सातत्याने घडणार्या या दुर्घटना लक्षात घेऊन देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील पावसाळी पर्यटन केंद्रांवर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. पण, या आदेशानंतर बराच गदारोळ उडाला. पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. स्थानिकांचे रोजगार बुडत असल्याने त्यांनीही यावर आक्षेप नोंदवला. अखेर प्रशासनाने ही बंदी मागे घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
जिल्ह्यात धरणांवर आणि धबधब्यांवर वर्षासहलीसाठी येणार्या पर्यटकांचे प्रमाणही मोठ असते. पावसाचा जोर वाढल्यास या धरणांमधून आणि धबधब्यांमधून येणार्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो. या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून जातात. समुद्र किनार्यावरील परिस्थिती काहीशी वेगळी असते. पर्यटकांना समुद्राला येणार्या भरती-ओहोटीचा अंदाज नसतो. याशिवाय पाण्यातील अंतर्गत प्रवाहांची माहिती नसते. स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पर्यटक खोल पाण्यात उतरतात आणि नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडतात. म्हणून सरसकट वर्षा पर्यटन केंद्रांवर बंदी घालणे हा निर्णय स्थानिकांच्या मुळावर येणारा असल्याचा आरोप केला जात आहे.
पावसाळी पर्यटनाच्या मर्यादित काळात अमर्याद पर्यटक विविध स्थळांना भेटी देतात. शनिवार-रविवार आणि जोडून सुट्ट्यांच्या काळात तर गर्दीचे विक्रम नोंदविले जातात. याचा परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी, टोल नाक्यावरील गर्दी, पार्किंगच्या वाहनांच्या रांगा, हुल्लडबाज पर्यटकांचा त्रास, बेफिकीर पर्यटकांची कचराबाजी, हलगर्जी पर्यटकांचे अपघात, वादावादी आणि शेवटी पर्यटनबंदी! विशेषत: पावसाच्या सरी बरसत असताना कांदाभजी, भुट्टा, नॉनव्हेज, वडा-पाव खात खात भिजतानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळे हाउसफुल्ल होतात. स्थानिक प्रशासन कोलमडते आणि शेवटी बरीचशी पर्यटनस्थळे ऐन हंगामात बंद केली जातात. यातून स्थानिक रोजगार आणि महसूल मोठ्या प्रमाणात बुडतो.
अशी घ्या काळजी
पर्यटकांना स्थानिक परिस्थितीची माहिती देणारे सूचना देणारे फलक बसवणे. धरण, धबधबे, नद्या आणि तलावांमध्ये वर्षासहलीसाठी येणार्या पर्यटकांसाठी पोहण्यासाठी सुरक्षित ठिकाणे निश्चित करणे, रिंग बोयाज, लाईफ जॅकेट आणि मदत व बचाव लागणारी सामुग्री सज्ज ठेवणे आवश्यक आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. याची जाणीव ठेवून पर्यटकांना सतर्क करणे गरजेच आहे.