मिनीट्रेनची पावसाळी सुट्टी संपली

आजपासून नेरळ-माथेरान-नेरळ वाहतूक सुरू

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनची पावसाळी सुट्टी संपली असून, हिवाळी पर्यटन हंगामासाठी पुन्हा नव्या दमाने ती रुळावर आली आहे. पर्यटकांची लाडकी नरोगेजवर चालणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन शनिवारी, 4 नोव्हेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत आली. पावसाळी सुट्टीवर गेलेली मिनीट्रेन नेहमीच्या वेळेपेक्षा 20 दिवस उशिराने प्रवाशांच्या सेवेत आली आहे.


मिनीट्रेन दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने पर्यटक प्रवाशांसाठी बंद केली जाते. माथेरानच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि दरडी कोसळण्याच्या भीतीने नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन बंद ठेवली जाते. 15 जून रोजी पावसाळी विश्रांती घेण्यासाठी जाते आणि पुन्हा 15 ऑक्टोबर रोजी मिनीट्रेन प्रवाशांच्या दिमतीला येत असते. मात्र, यंदा 2023 मध्ये नेरळ-माथेरान-नेरळ ही 20 किलोमीटर अंतरावर जाणारी मिनीट्रेन 15 ऑक्टोबर रोजी पर्यटक प्रवाशांच्या सेवेत आली नाही. नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावर सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे मिनीट्रेन वेळेवर सुरु झाली नाही. स्थानिकांच्या मागणीनुसार खा. श्रीरंग बारणे यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना पत्र देऊन मिनीट्रेनची सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती.


मध्य रेल्वेने दोन दिवसांपूर्वी नेरळ येथून माथेरान मिनीट्रेनची प्रवासी सेवा 4 नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी या पर्यटन हंगामातील पहिली प्रवासी मिनीट्रेन नेरळ येथून माथेरानकरिता रवाना झाली. यावेळी एकूण 109 पर्यटक प्रवाशांनी प्रवास सुरू केला. यावेळी मध्य रेल्वेच्या नेरळ लोको कार्यशाळेकडून ट्रेनला सजवण्यात आले होते. दरम्यान, पहिल्या गाडीचे श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले आणि नंतर या पहिल्या मिनी ट्रेनला नेरळ स्थानक प्रबंधक गुरुनाथ पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यावेळी उपस्थानक प्रबंधक चेतराम मीना तसेच पीडब्ल्यूआय सानप हे उपस्थित होते. एनडीएम 407 या लोको इंजिनाच्या सारथ्य मोटरमन सुनील गौड आणि सहकारी अंकित उपाध्याय यांनी आणि ट्रेन मॅनेजर म्हणून दीपक कुमार शर्मा आणि तिकीट तपासनीस अमर कांबळे यांनी जबाबदारी पाहिली. पहिल्या ट्रेनसाठी सकाळी तिकीट खिडकी उघडली असता पर्यटकांनी तिकीट घेण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी बुकिंग क्लार्क नरेश लोभी, विनोद दळवी तसेच इन्चार्ज विनोद मेनन यांनी तसेच पुढच्या गाडीसाठी अशोक गोफ आणि रोहिदास लोंगले यांनी काम पाहिले.

परिविक्षाधीन अधिकारी ठरल्या पहिल्या तिकीट होल्डर..
सिव्हील सर्व्हिसेसमध्ये निवड झालेल्या नवी दिल्ली येथील निवासी असलेल्या दीप शिखा यादव आणि क्रिती या मुंबई येथे दोन महिन्यांचे परिविक्षाधीन कमकाजासाठी आल्या आहेत. त्यांना देखील मिनी ट्रेनचे आकर्षण होते आणि त्यांना नेरळ माथेरान मिनी ट्रेन सुरु होणार याची माहिती मिळताच त्या दोन्ही महिला अधिकारी या माथेरानला जाण्यासाठी आणि पहिल्या गाडीमधून प्रवास करण्यासाठी नेरळ येथे पोहचल्या. मिनी ट्रेनच्या पहिल्या फेरीसाठी विस्टा डोम डब्बा लावला जाणार याची माहिती असल्याने या दोन्ही पर्यटक प्रवाशांनी पहिल्या मिनी ट्रेनची जी तिकिटे मिळविली, तीदेखील तब्बल 1500 रुपये मोजून.
सलून डब्बा मुंबईकर प्रवाशांचा
नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनच्या पहिल्या फेरीसाठी पाच प्रवासी यांच्यासाठी खास राखीव समजला जाणारा सलून डब्बा लावण्यात आला होता. मुंबई कुर्ला येथील करीम, अगान, अबिद, अस्लम आणि शहजाद या पाच प्रवाशांनी सलून डब्ब्यात पाच तिकिटे 1750 रुपये मोजून खरेदी केली आणि पहिल्या मिनीट्रेनमधून प्रवास सुरू केला.
नेरळ येथून 8.50 वाजता निघालेल्या पहिल्या गाडी मधून 110पैकी 109प्रवासी यांनी प्रवास केला. त्यात विस्टा डोम मधून 16पैकी 15 तसेच सलून डब्यामधून 18 आणि सेकंड क्लास तीन डब्यांमधून 90 प्रवासी यांनी प्रवास केला. नेरळ 10.25 वाजता सुटलेल्या ट्रेनमधून चार सेकंड क्लास डब्यांतून 83 प्रवासी, फर्स्ट क्लास डब्यातून 23 अशा 106 प्रवाशांनी प्रवास केला.
असे असेल मिनीट्रेनचे वेळापत्रक
नेरळ येथून सकाळी 8.50, 10.25
माथेरान येथून दुपारी 2.45, 4.00
Exit mobile version