आरसीएफ निवृत्त कर्मचाऱ्यांची मासिक सभा

| अलिबाग | प्रतिनिधी |

आरसीएफ मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी एक सोशल फोरम स्थापन केला आहे. या फोरमचे अध्यक्ष रविंद्र वर्तक हे असून सध्या 1,050 सभासद आहेत. त्यांची दरमहिन्याच्या संकष्टी चतुर्थीला कुरूळ वसाहतीतील पंचकोनी गणेश मंदिरात मासिक सभा होते. यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त जीवन सुकर होण्यासाठी आवश्यक ती सामाजिक, मानसिक मदत फोरम तर्फे करण्यात येते. त्याच बरोबर समाजातील गरजू लोकांसाठी परिस्थितीनुरूप मदत उभी करणे, विविध विषयांबद्दल जागरूकता, होणारे बदल, आनंदी जीवनासाठी व्याख्याने व उपक्रम वेळोवेळी आयोजित करण्यात येत असतात.

दरम्यान, भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या व स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांना प्रेरणादायी ठरलेल्या ‌‘वन्दे मातरम’ या गीतास 7 नोव्हेंबर रोजी दीडशे वर्षे पूर्ण झालीत. त्याच अनुषंगून नुकत्याच पार पडलेल्या फोरमच्या मासिक सभेत या गीतासंदर्भात माहिती देऊन संपूर्ण ‌‘वन्दे मातरम’ गीत फोरमचेच कोअर कमिटी मेंबर भालचंद्र देशपांडे यांनी सादर केले. या मासिक सभेचे अध्यक्षस्थान फोरमचे सचिव श्रीनिवास पाटील यांनी भूषविले, तर सूत्र संचालन रमेश म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version