मोरा-भाऊचा धक्का जलप्रवास सेवा संकटात

| उरण | वार्ताहर |

अनेक वर्षांपासून उरणवासीयांना जलद, प्रदूषणविरहित आणि वाहतूक कोंडीमुक्त स्वस्त आणि आरामदायी प्रवास घडवून देणारी उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) जलप्रवास सेवा सध्या संकटात सापडली.

सागरी सेतू आणि उरणपर्यंत लोकल धावत असल्याने चक्क मुंबई ते मोरादरम्यान सुरू असलेल्या लॉन्च बोटीचे 75 टक्के प्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे बोट मालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने मदत केली नाही, तर बोट सेवा बंद करण्याची वेळ येणार असल्याची माहिती फेरी बोट मालकांनी दिली. सागरी सेतू आणि उरणपर्यंत लोकल धावत असल्याने उरण ते मुंबई प्रवास करणार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी प्रवाशांना उरण ते मुंबईदरम्यान रस्तामार्गे प्रवास करताना दोन ते अडीच तासच लागत होते. त्याचप्रमाणे वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडी आदींचाही त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता. दुसरीकडे उरण ते मुंबई जलमार्गे प्रवास करत असताना 50 ते 62 रुपये मोजावे लागत असून रस्त्याच्या प्रवासापेक्षा निम्म्या वेळेत मुंबईत पोहोचता येत होते; मात्र शिवडी-न्हावा शेवा हा मअटल सेतूफ आणि खारकोपर ते उरणदरम्यान लोकल सेवा सुरू झाल्यापासून येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी पर्याय मिळाला आहे. त्यामुळे फेरी बोटींची प्रवासी संख्या निम्म्यावर आली.

कोरोनापूर्वी भाऊचा धक्का ते मोरादरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 1200 ते 1500 पर्यंत होती. कोरोनानंतर प्रवासी संख्या एक हजारवर आली. आता सागरी सेतू आणि उरणपर्यंत लोकल धावत असल्याने बोट सेवांमधून प्रवास करणार्‍यांची संख्या 200 पर्यंत आली आहे. कधीकधी एक किंवा दोन प्रवासी घेऊन बोट चालवावी लागत आहे; तर कधी एकही प्रवासी नसल्याने रिकाम्या बोटी चालवण्याची नामुष्की फेरी बोट मालकांवर आली आहे.

प्रवासी संख्या निम्म्यावर आल्यामुळे फेरी बोटीला लागणारे इंधन, कामगारांचा पगार आणि देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च कुठून काढायचा, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या 200 कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शराफत अली हुसेन मुकादम
मुंबई जल वाहतूक सचिव
Exit mobile version