मोरा-भाऊचा धक्का लाँच सेवा बंद

गाळात रुतल्याने लाँच धक्क्याला; दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांची गैरसोय

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरणची जीवनवाहिनी बनलेली मोरा-भाऊचा धक्का लाँच सेवा सागरी मार्गातील गाळ उपसण्याच्या कामासाठी दि. 29 नोव्हेंबर ते चार डिसेंबरदरम्यान दररोज दोन ते तीन तास धक्क्याला लागणार आहे. याबाबतची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली आहे. मोरा बंदरालगतचा गाळ काढण्याचे काम सहा दिवस सुरू राहणार आहे, असे ही ते म्हणाले.

गेल्या दोन वर्षांपासून या बंदारातील गाळच काढला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2022 मध्ये चार कोटी खर्च करून गाळ काढण्यात आला. मात्र, हा गाळ थुकपट्टी लावून काढण्यात आल्याने ही परिस्थिती जैसे थे आहे. बंदरातील साचलेल्या गाळामुळे ओहोटीच्या वेळी खबरदारी म्हणून लाँच सेवेच्या फेर्‍या दुपारनंतर कमी करण्यात आल्या आहेत. सागरी प्रवासी वाहतूक कोलमडल्याने कामानिमित्त दररोज प्रवास करणार्‍यांना प्रवाशांना याचा फटका बसत आहे. गाळामुळे सातत्याने विस्कळीत होत असलेली उरण-भाऊचा धक्का प्रवासी लाँच सेवा सुरळीत करणार्‍यांसाठी महाराष्ट्र बंदर विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढण्यात येतो. मात्र, त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरण्याचे काम थांबलेले नाही.

उरण ते मुंबईदरम्यान सुरू असलेली लाँच सेवा ही उरणच्या रहिवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. परंतु, समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे या मार्गावरील मोरा बंदरालगत सातत्याने गाळ जमा होतो. याचा परिणाम होऊन लाँच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या कारणामुळे ओहोटीच्या वेळेस लाँच सेवा तीन ते चार तास बंद ठेवावी लागते. 29 नोव्हेंबर ते चार डिसेंबरदरम्यान मोरा जेट्टीलगतचा गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे. यादरम्यान दुपारच्या वेळेत लाँच सेवा दोन ते तीन तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लोकल सेवेमुळे लाँचने प्रवास करणार्‍या प्रवासी संख्येवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version