तंदुरुस्तीवर अधिक मेहनत गरजेची!

भारतीय बॅडमिंटनपटूंबाबत सायना नेहवालचा सल्ला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनच्या व्यग्र कार्यक्रमाला सामोरे जाताना सातत्याने यश मिळविण्यासाठी भारतीय खेळाडूंनी शारीरिकदृष्ट्या कणखर असणे गरजेचे आहे. त्यांनी तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घ्यायला हवी, असे मत ऑलिम्पिक पदकविजेती माजी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले. सध्याच्या खेळाडूंमध्ये दुखापतींचे प्रमाण वाढले असून ही नक्कीच चिंताजनक बाब असल्याचे सायनाने नमूद केले. त्याचवेळी नव्या दमाच्या महिला बॅडमिंटनपटूंमध्ये आक्रमकतेची कमतरता जाणवते, असेही सायना म्हणाली.

अलीकडच्या काळात आपल्या बॅडमिंटनपटूंना फारसे यश मिळवता आलेले नाही. सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी, तसेच एकेरीत लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधू यांनी कामगिरीत सातत्य राखायला हवे. तसेच नव्या दमाच्या खेळाडूंनी पुढे येणे आणि आपली छाप पाडणेही भारतीय बॅडमिंटनच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे सायनाने नमूद केले.

खेळाडूंनी बहुधा अधिक चांगले प्रशिक्षक आणि फिजिओ यांचा शोध घेतला पाहिजे. शारीरिकदृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त असलात, तर खेळात सातत्य राखणे तुम्हाला सोपे जाते. सलग दोन किंवा त्याहून स्पर्धा जिंकायच्या असल्यास आपल्या खेळाडूंनी तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे. पुरुषांत व्हिक्टर ॲक्सेलसन वर्चस्व राखून आहे. पूर्वी महिलांमध्ये कॅरोलिना मरीन अशी कामगिरी करायची. सर्वोच्च स्तरावर खेळताना मानसिकदृष्ट्या सर्वच खेळाडू कणखर असतात. तुम्ही शारीरिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात यश मिळाले, तर तुम्हाला कामगिरी उंचावण्यास मदत होते, असे सायनाने सांगितले.

लक्ष्यकडून अपेक्षा
गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या लक्ष्य सेनने कामगिरी उंचावताना रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यंदाच्या हंगामातील हे त्याचे पहिले जेतेपद होते. याबद्दल सायनाने त्याचे अभिनंदन केले. स्पर्धा जिंकणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे खेळाडूचा आत्मविश्वास वाढतो. लक्ष्यने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत चांगला खेळ केला. त्याला सूर गवसला ही त्याच्यासाठी आणि भारतासाठी महत्त्वाची बाब आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य आपला सर्वोत्तम खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. आता त्याने कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे,असे सायना म्हणाली.
Exit mobile version