पायी वारीच्या निर्णयाबाबत अजून आशा

माऊली पालखी सोहळा संघटनेची सभा
पंढरपूर | प्रतिनिधी |
यंदा आषाढीला पायी पालखी सोहळा घेऊन जाण्याबाबत वारकरी आग्रही असून आम्हाला शासनाकडून अजून आशा आहे. मात्र शासनाने परवानगी न दिल्यास मात्र शासकीय नियमानुसार पालखी सोहळा करणार अशी माहिती संत ज्ञानेश्‍वर पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी यांनी दिली. आज संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील नोंदणी असलेल्या 430 दिंडी प्रतिनिधी, पालखी सोहळा विश्‍वस्त आणि आळंदी देवस्थान विश्‍वस्त यांची पंढरपूर मधील ज्ञानेश्‍वर मंदिरात बैठक झाली.

दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीतून माध्यम प्रतिनिधींना बाहेर पाठवण्यात आले होते. यंदा पायी पालखी सोहळ्याबाबत अनेक वारकरी महाराज आग्रही होते. बैठकीनंतर बोलताना अध्यक्ष गोसावी यांनी वारकर्‍यांची आग्रही भूमिका असून पालखी विश्‍वस्त शासनाशी चर्चा करीत असल्याचे सांगितले. आम्हाला राज्य सरकारकडून अगदी प्रस्थानाच्या दिवसापर्यंत पायी वारीच्या परवानगीची आशा आहे. मात्र माऊली पालखी सोहळा शासनाचे नियम मोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत प्रस्थानाच्यावेळी सर्व 430 दिंड्यांच्या प्रतिनिधीला उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी याच सोबत पंढरपुरात आल्यावर देखील माऊलीचा पालखी सोहळा वैभवाने व्हावा, पालखी सोबत अश्‍वाला परवानगी मिळावी अशा मागण्या केल्याचे यावेळी पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड विकास ढगे यांनी सांगितले.

यंदा पालखी सोहळ्यासोबत अश्‍वाला परवानगी द्या
यंदा आषाढी यात्रेसाठी येणार्‍या संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्यासोबत अश्‍वाला परवानगी देण्याची मागणी माऊली पालखी सोहळ्याचे प्रमुख अ‍ॅड विकास ढगे यांनी केली आहे. एसटी बसने पालखी आणण्याच्या शासनाचा निर्णय आम्ही आणि वारकरी संप्रदायाने मान्य केला असून पायी वारीचा प्रश्‍नच येत नसल्याची भूमिका ढगे यांनी मांडली. यंदा जरी पालखी बसने येणार असली तरी प्रस्तानंतर अश्‍वाला वाखरी येथे आणण्याची परवानगी आम्ही मागितली असून जिथे माऊली तिथे आशण अशा पद्धतीने वाखरी येथून पंढरपूरकडे पायी चालत जाताना अश्‍व सोबत असावा अशी मागणी त्यांनी केली.

Exit mobile version