रायगडात एसटीचे आणखी कर्मचारी दाखल

25 लाखांवर उत्पन्न
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पुन्हा सेवेत रुजू होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ होत असून आजपर्यंत 1 हजार 400 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे दिवसभरात तब्बल 1 हजार 60 एसटीच्या फेर्‍या झाल्या असून 54 हजार किलोमीटर पर्यंत एसटीची सेवा झाली असून दिवसभराचे उत्पन्न 25 लाखांवर गेले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपकरी कर्मचारी पुन्हा कामावर हजर होण्यात वाढ झाली असून आतापर्यंत रायगड विभागातील 1 हजार 644 पैकी 1 हजार 400 कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत.
रायगड विभागातील प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, चालक तथा वाहक आणि वाहक असे एकूण 1 हजार 644 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी न्यायालयाच्या आदेशानंतर 267 कर्मचारी पुन्हा सेवेत हजर झाले आहेत. त्यामुळे एकुण हजर कर्मचारी संख्या 1 हजार 400 झाली आहे. अलिबाग आगारात देखील मंगळवारी 223 कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे अलिबाग आगारातून मोठया प्रमाणावर फेर्‍या सुरु झाल्या असून आता लवकरच ग्रामीण भागातील फेर्‍या देखील पुर्ववत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Exit mobile version