कोकण नारळ लागवडीसाठी अधिक पूरक

29 हजार 61 हेक्टर क्षेत्रावर लागवड

| रायगड | सुयोग आंग्रे |

बारमाही उत्पादन देणारे पीक म्हणून नारळाकडे पाहिले जाते. मात्र, पूरक परिस्थिती असूनही कोकणात त्याच्या लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून प्रचार, प्रसारावर भर देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अपारंपरिक क्षेत्रात नारळ लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी नारळ विकास मंडळाने पुढाकार घेतला आहे. कोकणात सुमारे 29 हजार 61 हेक्टर क्षेत्रावर नारळ लागवड झाली. उपलब्ध क्षेत्राच्या तुलनेत नारळ लागवड अत्यंत कमी आहे. कोकणातील नारळाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोकणात नारळ लागवडीला चालना देण्याची आवश्यकता आहे. कोकणातील हवामान, पाणी नारळ लागवडीसाठी पूरक आहे. तुलनेत येथील बागायतदार लागवडीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. चार महिन्यांनी सेंद्रीय खत आणि व्यवस्थित पाणी दिल्यास 250 ते 300 नारळ दर चार महिन्यांना मिळतील. 2012 मध्ये जागतिक नारळ दिनी नारळ बोर्डाच्या एका कार्यक्रमात राज्याचे तत्कालीन कृषी खात्याच्या सचिवांनी पुढील तीन वर्षांत एक लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे निश्चित केले होते. मात्र, ते उद्दिष्ट पूर्ण झाले नाही.

लागवडीसाठी झाडेही कोकणात उपलब्ध आहेत. नरेगा योजनेतून अनुदान मिळते. नारळ बोर्डाकडून मिळालेल्या अनुदानाचा फायदा नगर, सांगली, औरंगाबादमधील बागायतदारांनी घेतला. मात्र, कोकणातून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. आजरा, रोहा आणि पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातून एक लाख रोपे होतील, अशा नर्सरी बोर्डाच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. काथ्या उद्योगासाठी शासनाकडून पाठबळ दिले जात आहे. त्यासाठी कच्चा माल नारळ लागवडीतून मिळेल. भविष्यात असा प्रयोग कोकणात झाल्यास नारळ बागांना महत्त्व प्राप्त होईल. त्यादृष्टीने बागायतदारांनी विचार करणे आवश्यक आहे.

अपारंपरिक क्षेत्रात नारळ लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न मंडळ करीत आहे. महाराष्ट्रात नारळ लागवड वाढावी याकरिता पालघर येथे 100 एकरांवर संशोधन केंद्र आहे. देश-विदेशांतील 16 वाणांची लागवड या ठिकाणी करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या भाटे येथे प्रादेशिक संशोधन केंद्र असून, त्या ठिकाणावरून बियाणे आणत त्यापासून पालघरला रोप तयार केली जातात व ती शेतकऱ्यांना विकण्यात येतात. शासकीय फार्मवरून उंच वाढणाऱ्या रोपाचे दर 70, तर ठेंगू वाणासाठी 95 रुपये असा आहे. बानावली तसेच यातून निवड पद्धतीने विकसित प्रताप हे दोन वाण महाराष्ट्राकरिता शिफारशीत आहेत. पाट आणि ठिबकच्या पाण्यावर देखील हे पीक घेता येते. प्रत्येक महिन्याला याला फुल धारणा होते. त्यानुसार बारा फुले येत असली, तरी त्यातील 8 ते 9 सेट होतात व त्यापासून फळे मिळतात. नारळ उत्पादकतेच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा असा मंडळाचा उद्देश आहे. त्याच कारणामुळे अपारंपरिक क्षेत्रातही नारळाला प्रोत्साहन दिले जात आहे.

विविध आजारांवर नारळपाणी उपयोगी
नारळाच्या झाडाच्या पानांपासून छत, टोपल्या, विविध आकर्षक वस्तू बनविल्या जातात. नारळाचे फळ बहुपयोगी आहे. शहाळ्याचं पाणी आरोग्यासाठी हितकारक आहे. शहाळ्याचं कवच वाळवून इंधन स्वरूपात वापरलं जातं. खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी उपयोगी आहे. नारळाच्या फायबरपासून सुतळी, चटई आदी वस्तू बनविल्या जातात. विविधांगी उपयोगामुळे नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम व मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. शरीरातील पाणी प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी नारळ पाणी उपयोगी आहे. पोटॅशिअममुळे अतिरक्तदाब कमी करण्यास मदत होते. नारळाचे पाणी नैसर्गिक असून, त्यात कोणतेही बाह्य कृत्रिम पदार्थ नसतात. त्यामुळे शरीरासाठी ते उत्तम पेय आहे. अँटी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असल्याने किडनी स्टोन कमी होण्यात मदत होते. जे नियमित प्रमाणात नारळाचे पाणी पितात त्यांना शुगरचा त्रास होत नाही.
कोकणातील नारळ लागवड स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
पालघर : 1,630
रायगड : 2,337
रत्नागिरी : 5,030
सिंधुदुर्ग : 20,064
ठाणे : 0
Exit mobile version