| पनवेल | प्रतिनिधी |
गेल्या आठ वर्षांत पनवेल महापालिकेच्या हद्दीत तब्बल 1 लाख 29 हजारांहून अधिक नव्या मतदारांची भर पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदारसंख्या सव्वालाखांहून अधिक झाली आहे. ही वाढलेली मतदारसंख्या आणि विशेषतः शहरी भागातील कॉस्मोपॉलिटन मतदारांचा कल, येत्या 15 जानेवारीला कोणत्या राजकीय पक्षाच्या पारड्यघत पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पनवेल महापालिकेने नुकतीच जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार यावेळी एकूण 5 लाख 54 हजार 578 मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. यामध्ये 2 लाख 59 हजार 685 महिला मतदार तर 2 लाख 94 हजार 821 पुरुष मतदारांचा समावेश आहे. तुलनेने 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत एकूण मतदारसंख्या 4 लाख 25 हजार 453 इतकी होती. आठ वर्षांत 1 लाख 29 हजार 114 मतदारांची वाढ झाल्याने प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्येचे गणित बदलले आहे. विशेष म्हणजे ही वाढ प्रामुख्याने पनवेल महापालिकेच्या शहरी भागात झाली आहे. विमानतळ प्रकल्प, नवी गृहनिर्माण संकुले, आयटी आणि सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक विद्यासंकुले यांमुळे विविध राज्यांतून तसेच महानगरांमधून नागरिकांनी पनवेलमध्ये स्थायिक होण्यास पसंती दिली आहे. परिणामी, पारंपरिक ग्रामीण मतदारांसोबतच उच्चशिक्षित, नोकरपेशा आणि मध्यमवर्गीय शहरी मतदारांचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढला आहे.
पहिल्या तीन प्रभागांमध्ये पूर्वीपेक्षा आता 41,954 मतदारांची वाढ झाली आहे. यापूर्वी या तीनही प्रभागांमध्ये 51,380 मतदार होते सद्य स्थितीला या तीनही प्रभागात 93,334 वर मतदारसंख्या पोहचली आहे. तसेच प्रभाग 6 मध्ये दुप्पट मतदारसंख्या झाली आहे. यापूर्वी 16,293 मतदारांची संख्या आता 37,172 वर पोहचली आहे. हे चारही प्रभाग तळोजा ग्रामीण, तळोजा वसाहत आणि खारघरमध्ये येतात. अशीच स्थिती कळंबोलीतील प्रभाग क्रमांक 8, कामोठे येथील 11 व 12 या मतदारसंघी आहे. 10 हजारांपेक्षा अधिकचे मतदार या प्रभागांमध्ये वाढले आहेत.
