महापालिका आयुक्तांची जाहीर कबुली
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई महापालिकेच्या येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 9 लाख 48 हजार 460 मतदार मतदान करणारा असून, त्यामध्ये 45 हजार 588 इतके दुबार मतदार आहेत, अशी जाहीर कबुली नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी दिली. सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात यंदा 1 हजार 48 मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. मात्र, त्यापैकी एकही मतदान केंद्र हाऊसिंग सोसायटीमध्ये नसेल, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासनाने कशा पद्धतीने तयारी केली आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महापालिका आयुक्त डॉ. शिंदे म्हणाले, नवी मुंबई शहरात प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. उमेदवार जर मतदान केंद्र असलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये राहात असेल तर त्या सोसायटीमधील मतदारांवर दबाव येण्याची शक्यता असते, त्यामुळे हाऊसिंग सोसायटीमधील मतदार केंद्र यंदा बंद करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर मतदारांची संख्या 800 ते 850 इतकी ठेवण्यात आली आहे, अशी आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, लेखा अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त भागवत डोईफोडे आदी उपस्थित होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची फौज तैनात ठेवली आहे. त्यापैकी 5 हजार 705 कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काम करणारा असून, उर्वरित कर्मचारी हे राखीव असणार आहेत, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
आठ ठिकाणी स्वीकारणार अर्ज
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 28 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. या प्रभागातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज हा आठ केंद्रांवर दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 23 ते 30 डिसेंबरदरम्यान आहे. याच कालावधीमध्ये दि. 25 आणि 28 डिसेंबर हे दोन दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. या दोन्ही दिवशी अर्जाचे वितरण होणार आहे. मात्र, अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशीही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
निकाल अवघ्या दोन दिवसांत
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आठ मतमोजणी केंद्र तयार करण्यात येणार आहेत. 2015 च्या निवडणुकीची मतमोजणी फक्त तीन मतमोजणी केंद्रावर झाली होती. मात्र, यंदा मतमोजणी केंद्राची संख्या पाचने वाढवली जाणार असल्याने निकाल अवघ्या दोनच तासांत लागणार आहे.
दुबार मतदारांवर नजर
नवी मुंबई शहरात एकूण मतदारांची संख्या नऊ लाख 48 हजार 400 साठी इतकी आहे. त्यामध्ये पाच लाख 16 हजार 267 पुरुष मतदार, तर चार लाख 32 हजार 40 महिला मतदार आहेत. दुबार मतदारांची संख्या 45 हजार 588 इतकी आहे. या मतदारांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. दुबार मतदारांना एकच ठिकाणी मतदान करता येणार आहे.







