यात्रेला विविध राजकीय पक्षाचा पाठींबा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेड मध्ये येत आहे, या यात्रेसाठी रायगड मधून 500 हुन अधिक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस सचीव ऍड प्रवीण ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष ऍड श्रद्धा ठाकूर, मानवाधिकार समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्ष सौ. कविता ठाकूर उपस्थित होत्या. ही यात्रा केवळ राजकीय उद्देशाने नव्हे तर सर्वाना एकत्र आणण्यासाठी सुरू असल्याने विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याचे प्रवीण ठाकूर म्हणाले.
भारत जोडो यात्रेसाठी रायगडची जबाबदारी समन्वयक म्हणून ऍड प्रवीण ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या यात्रेच्या नियोजनासाठी मंगळवारी अलिबागेतील बॅ. ए. अंतुले काँग्रेस भुवन येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकितील नियोजनसंदर्भात माहिती देताना ऍड प्रवीण ठाकूर म्हणाले की, एकीकडे भारत तोडे चे प्रयत्न होत असताना खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू करून भारत जोडण्याची, सर्वाना एकत्र आणण्याची जी भूमिका घेतली आहे, त्याला देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार , यांच्या सह इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचा देखील पाठींबा मिळत आहे. शेकापचा देखील पाठींबा असल्याची माहिती ऍड. ठाकुर यांनी दिली.
खा. राहुल गांधी हे आता पर्यंत 1200 किमी चालले आहेत. 3600 किमी चा प्रवास आहे. त्यांच्या अभियानाचे कौतुक करताना, ही यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे येईल त्यात रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील. त्या नंतर 19 नोव्हेंबर ला बुलढाणा, शेगाव या प्रवासात देखील रायगड मधून कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यात्रेत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाते. असे त्यानी सांगितले.
माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्या समरणार्थ ठाकूर कुटुंबियांकडून लाखाचे अर्थसहाय्य
भारत जोडो यात्रे साठी रायगड मधून जे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत त्यांच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस सचिव ऍड प्रवीण ठाकूर यांच्यावर आहे. दरम्यान या यात्रे साठी ऍड प्रवीण ठाकूर आणि राजाभाऊ ठाकूर यांच्या पुढाकाराने आज आगाऊ रक्कम म्हणून रोखीने 1 लाख रुपये पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्या समरणार्थ हा निधी देण्यात आला असून आणखी येणारा खर्च देखील करण्याची तयारी असल्याचे राजाभाऊ ठाकूर यांनी सांगितले. या वेळी ऍड प्रवीण ठाकूर,जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, अलिबाग तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अलिबाग तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष योगेश मगर आदी उपस्थित होते.