रेल्वे पुलाचे निविदेअभावी काम रखडले; दोन वर्षांपासून दासगाव-गोठे होडी मार्ग बंद
| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील दासगाव पुरातन काळापासून बंदर आहे. दासगाव आणि मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला तसेच खाडी पट्टा विभागाला जोडणारा एकमेव दासगाव ते गोठे खाडी मार्ग आहे. गोठे गावी जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. दर तीन वर्षांनी या मार्गावर होडी चालवण्यासाठी महाड पंचायत समितीकडून निविदा काढली जाते. पूर्वीची मुदत संपल्यानंतर 2021 मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती; परंतु कोणीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे होडी मार्ग बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिक जवळच असलेल्या रेल्वे पुलाचा वापर करत आहेत.
ब्रिटिश काळापासून महाड तालुक्यातील दासगाव हे महत्त्वाचे बंदर आहे. या ठिकाणी दासगाववरून खाडी पट्टा विभागात जाण्यासाठी सावित्री खाडीमध्ये दासगाव ते गोठे होडी मार्ग सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणीही होडी चालवण्याची निविदा घेत नसल्याने होडी मार्ग बंद आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक खाडी विभागात जाण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर करीत आहेत.
या मार्गावर होडी चालवण्यासाठी दर तीन वर्षांनी महाड पंचायत समितीकडून निविदा प्रसिद्ध केली जाते. पूर्वीची मुदत संपल्यानंतर 6/1/2021 मध्ये पंचायत समितीकडून 2021 ते 2023 साठी निविदा काढण्यात आली होती; परंतु यामध्ये कोणीही भाग न घेतल्याने आज हा होडी मार्ग बंद आहे. पंचायत समितीकडून नागरिकांच्या सुविधांचा विचार करून पुन्हा निविदा काढणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. नागरिकांच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दर दिवस शेकडो लोक कोकण रेल्वेच्या पुलाचा वापर करत आहेत. दर अर्ध्या तासाने पुलावरून रेल्वेची वाहतूक होत असल्याने पुलावरून जाणे धोक्याचे आहे.
मागील वर्षी निविदा काढण्यात आली होती; परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी बाळकृष्ण काप यांनी दिली.