‘मोरझोत’ वर्षापर्यटनाचा मानबिंदू

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

पोलादपूर तालुक्यातील उमरठ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यावरून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे सुशोभिकरण व तेथून पुढे रामाचे कुडपण येथील नरवीरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभिकरण पाहून झाल्यानंतर थेट चांदके ते खोपड रस्त्यालगत पावसाळयात एक मोठा जलौघ थेट रस्त्याच्या मोरीपर्यंत जलतुषारांची सप्तरंगी उधळण करीत सुखावतो. या धबधब्याला मोरझोत धबधबा म्हणून तालुक्यासह महाड, पोलादपूर, माणगाव परिसरामध्ये ओळखले जाते. महाड तालुक्यातील वरंध घाटामधून रामदासपठारच्या सुंदरमठासमोर दिसणारा मोरझोत धबधबा पोलादपूर तालुक्यातील उमरठपासून दीड कि.मी.अंतरावर चांदके ते खोपड दरम्यान आहे.

मोरझोत धबधबा हा खोपड ते चांदके रस्त्यालगतच असल्याने सुगम आहे. परंतु, तेथे जाण्यासाठी अलीकडेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा रस्ता जीर्ण होऊ लागल्याने तसेच उमरठपर्यंतचा रस्ता पक्का नसल्याने वर्षासहलींमधून येणार्‍या तसेच मोटारसायकलस्वार पर्यटकांना कंबरडे ढिले करणारा अनुभव घ्यावा लागतो. रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्यांवर लालमातीचा चिखल वाहनांच्या टायरसोबत रस्त्यावर येऊन रस्ते निसरडे होत आहेत. मात्र, थ्रील अनुभवण्यासाठी विविध ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपचे मुंबई, महाड, पुणे, खेड आणि अन्य भागांतील तरूण-तरूणी येथे आठवड्याच्या शेवटी आवर्जून येत असतात. प्रवासातील दु:खद अनुभव घेत वाटचाल करणारी तरूणाई भरपावसात थेट चांदके रस्त्यावर जलतुषारांची उधळण करणार्‍या मोरझोत धबधब्याचे दर्शन घेताच हर्षोल्हासाने चित्कार करीत नेसत्या वस्त्रानिशी धबधब्याखाली उभी राहण्यास आसुसलेली असल्याचे दिसून येते. तरूणाईकडे फोरव्हीलर असेल तर आतील म्युझिक सिस्टीमच्या दणकेबाज आवाजात ‘रेन डान्स’देखील केला जातो.

या धबधब्यावर वर्षासहलीसाठी येणार्‍या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे मक्याची कणसं, कोंबडी मटण-वड्यांची सागुती, चणे, शेंगदाणे, पॉपकॉर्न आणि स्नॅक्स तसेच गरमागरम चहाच्या गिर्‍हाईकांकडून स्थानिकांना दिवसागणिक चांगली कमाई होत असते. ‘विकेंड’ सुट्टीच्या दिवसांत जरी तरूणाईला काही प्रमाणात अपेयपानाची झिंग असली तरी आठवड्याच्या अन्य दिवशी येणारे वर्षापर्यटक मात्र निखळ आनंद घेण्यास मित्र-मैत्रिणींचा ग्रुप अथवा सहकुटुंब मित्रपरिवार येऊन मोरझोत धबधब्याखाली उभे राहून सचैल स्नान करतात. 2021 मध्ये या मोरझोत धबधब्याजवळ दरडी कोसळल्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये पर्यटकांनी सावधपणे धबधब्याचा आनंद घेतला. मात्र, आता परिसरातील दरडी पूर्णपणे हटविण्यात आल्याने धबधब्याचे पात्र पूर्वीप्रमाणे शुभ्रधारेने कोसळून सप्तरंगी जलतुषारांची बरसात करीत आहे.

Exit mobile version