मॉर्निंग क्लबकडून ज्येष्ठांचा सन्मान

प्लास्टिक पिशवी न वापरण्याचा संकल्प

| रोहा | प्रतिनिधी |

मॉर्निंग क्लबने नववर्षाच्या पहाटे कुंडलिका नदी किनारी ट्रॅकवर नियमित चालायला येणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान केला. यावेळी मॉर्निंग क्लबच्या सदस्यांनी प्लास्टिक पिशवी न वापरण्याचा संकल्प केला असल्याचे अध्यक्ष प्रज्योत गुरव यांनी जाहीर केले.

येथील मॉर्निंग क्लबने ‘चला आरोग्य जपूया, रोज चालण्याची सवय लावूया’ हे मंत्र देत नवीन वर्षाच्या सकाळी मॉर्निंग क्लबच्या सदस्यांनी एकत्र येत वॉकसाठी येणाऱ्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. वॉकिंग ट्रॅकवर आयोजित कार्यक्रमात रोहा सिटिझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब यांच्या हस्ते रविंद्र वैद्य, विजय देसाई, चंद्रकांत जाधव या नियमित वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष नितिन परब, मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष प्रज्योत गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. मॉर्निंग क्लब मेंबर्स आजपासून प्लास्टिक पिशवी वापरणार नसल्याचा संकल्प सोडण्यात आला. क्लबचे सरचिटणीस शैलेश कोळी यांनी नियोजन केले तर रत्नाकर कनोजे यांनी आभार मानले. यावेळी फारुक सवाल, गणेश सावंत, किरण गुल्हाने, प्रज्ञेश भांड, वामन चव्हाण, भाई पाटील, बाबू कडू, ऋतुराज अष्टीवकर, प्रवीण कापडी आदी उपस्थित होते.

पहाटे चालणे ही आपली जीवनशैली व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. इतरांनी याची प्रेरणा घेऊन सकाळी चालणे सुरू करावे असे आमचे प्रयत्न आहेत. प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी सिटीझन फोरम ट्रस्ट कायम प्रयत्नशील आहे, असे नितीन परब म्हणाले.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. याची सुरुवात स्वतःपासून करीत प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करण्याचा संकल्प केला आहे.

-प्रज्योत गुरव, अध्यक्ष मॉर्निंग क्लब रोहा

Exit mobile version