धुरीकरणानंतरही डासांची भुणभुण

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई शहरातील हवा काही दिवसांपासून प्रदूषित आहे. अशातच दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने वातावरणातील बदलामुळे शहरात डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नवनवे प्रयोग, योजना राबवण्यात अग्रेसर असलेल्या नवी मुंबई महापालिका डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे पालिका जरी शहरात धूर फवारणी करत असल्याचा दावा करत असली तरी डासांची भुणभुण सुरूच असल्याने नवी मुंबईकर मात्र त्रस्त आहेत.

सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. अशातच प्रदूषित वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागणाऱ्या नागरिकांना आता डासांपासून उद्भवणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. डेंग्यू मलेरियाने देखील शहरात कहर केला आहे. त्यात शहरातील काही भागात धुरीकरण होते; तर काही भागात महिने-दोन महिने धुरीकरण होत नसल्याचे प्रकार समोर आला आहे. अशातच एकीकडे शहरातील सुरू असलेल्या नवनवीन विकासकामांवरील साठवलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढली आहे. तर, दुसरीकडे खाडी किनारी असलेल्या कांदळवनांमुळे डासांच्या उत्पत्तीने सायंकाळीच दारे खिडक्या बंद करून बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे धूर फवारणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे तगादा लावला जात आहेत. मात्र, पालिकेकडून धुरीकरण सुरू असल्याचे उत्तर वारंवार देत असून वापरण्यात येणारी औषधे कितपत परिणामकारक आहेत, याबाबत मात्र साशंकता आहे.

डासांना पळवण्यासाठी क्लृप्त्या
झोपडपट्टी व गावठाण भागांत डासांची संख्या अधिक आहे. अनेक जण डासांपासून तात्पुरती मुक्ती मिळावी, म्हणून इलेक्ट्रिक बॅट्स, अगरबत्ती, मच्छर दाणी किंवा घरभर धुरी करून डासांना पळवण्यासाठी क्लृप्ती करतात. पण तात्पुरत्या उपाययोजनांमुळे फक्त एका दिवसापुरताच दिलासा मिळत असल्याने कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी होत आहे.
Exit mobile version