सर्वाधिक पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार

राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून सर्वेक्षण
मुंबई | प्रतिनिधी |
राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणामधून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी केली असल्याचं दिसून आलं आहे. 81.18 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास आम्ही तयार आहोत, असं मत व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रामधील 6 लाख 90 हजार 820 पालकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 5 लाख 60 हजार 818 पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 6 लाख 90 हजार 820 पालकांपैकी 3 लाख 5 हजार 248 पालक ग्रामीण भागातील, 71 हजार 904 पालक निमशहरी भागातील आणि 3 लाख 13 हजार 668 पालक शहरी भागात राहाणारे आहेत.

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी सर्वाधिक म्हणजे 73 हजार 838 पालक हे पुण्यातील होते. तसेच मुंबई मनपा क्षेत्रातील 70 हजार 842 पालकांनी आपला प्रतिसाद यामध्ये नोंदवला. त्याप्रमाणे कोल्हापूरमधील 30 हजारहून अधिक, नाशिकमधील 47 हजारांहून अधिक, सातार्‍यातील 41 हजारांहून अधिक, ठाण्यातील 39 हजारांहून अधिक पालकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. या सर्वेक्षणामधील आकडेवारीवरुन पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भातील तयारी केल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

सर्वेक्षणामध्ये सहभागी पालक
2.89 टक्के मुले नर्सरीमध्ये
23.48 टक्के पहिली ते पाचवी
31.21 टक्के सहावी ते आठवी
41.54 टक्के नववी ते दहावी
15.26 टक्के 11 वी ते 12 वी

Exit mobile version