जेएनपीटी महामार्गावर सर्वाधिक दुचाकी अपघात

आतापर्यंत दुचाकीस्वारांचे 113 अपघात
79 पादचार्‍यांनी जीव गमावला

। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात दुचाकी चालकांच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पोलीस वाहतूक विभाग एक अहवाल तयार करीत आहे.

गेल्या वर्षी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकूण 269 मोटार अपघात झाले असून यात दुचाकीस्वारांचे प्रमाण 113 अपघातांचे आहे. उरणच्या जेएनपीटी बंदराकडे जाणारे रस्ते चकाचक झाल्याने या भागात दुचाकी अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. दुचाकी अपघातांत 79 पादचार्‍यांनी जीव गमावला आहे. त्यामुळे शहर नियोजनाच्या दृष्टीने दुचाकी वाहन अपघातांचे प्रमाण कमी कसे करता येईल याचा एक अभ्यास अहवाल तयार केला जात आहे.

नवी मुंबईतील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. या मध्यवर्ती शहरातून शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर महामार्ग जात असून आता पनवेल-उरण या जेएनपीटीकडे जाणार्‍या रस्याचा कायापालट झाला आहे. जेएनपीटी बंदराकडे मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहनांची वाहतूक होत असल्याने केंद्र सरकारने या मार्गाकडे विशेष लक्ष देऊन या भागाचा रस्ते विकास केला आहे. त्यामुळे सुसाट प्रवासात दुचाकी चालकांचा बळी जात आहे.

कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहेत. त्यामुळे या मार्गावर दुचाकीस्वारांसाठी वेगळी मार्गिका तयार करता येईल का याची चाचपणी पोलीस करीत असून तशा सूचना जेएनपीटी बंदर प्रशासनाकडे करण्यात येणार आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत शीव-पनवेल महामार्गावर 21 लाख वाहनांची ये-जा झाल्याची नोंद आहे. दुसर्‍या लाटेत ही संख्या चार पट वाढल्याचे दिसून येते. शीव-पनवेल, पामबीच, ठाणे-बेलापूर, आणि जेएनपीटी बंदर मार्गावरील प्रवास अधिक जलद व तितकाच अधिक धोकादायक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामुंबई क्षेत्रातील अपघातप्रवण क्षेत्रे नव्याने निश्‍चित करून दुचाकीस्वारांचा जीव जाणार नाही यासाठी काही उपाययोजना करण्याचा आराखडा वाहतूक पोलीस विभाग तयार करीत आहे.

जेएनपीटी बंदराकडे जाणार्‍या महामार्गावर हे प्रमाण वाढले आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असून येत्या आठवडाभरात याबद्दल एक अभ्यास अहवाल तयार केला जाणार असून त्याप्रमाणे स्थानिक प्राधिकरणांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जाणार आहेत. देशाची तरुण पिढी वाचविण्याच्या दृष्टीने ही उपाययोजना अत्यंत आवश्यक आहे. – पुरुषोत्तम कराड, उपायुक्त वाहतूक, नवी मुंबई पोलीस विभाग

Exit mobile version