मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू झरारचा काश्मीरमध्ये खात्मा

। जम्मू काश्मीर । वृत्तसंस्था ।
लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोस्ट वाँटेड असलेला दहशतवादी अबू झरारचा जम्मू-काश्मीरच्या पूंछ-राजौरी जिल्ह्यामध्ये खात्मा करण्यात आला आहे. अबू झरारला भारतामध्ये मोठ्या दहशतवादी कारवाया करण्यासोबतच सुरक्षा दलावर मोठे हल्ले करण्याची जबाबदारी सोपवून भारतात पाठवण्यात आल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी ऑगस्ट महिन्यात अबू झरार पहिल्यांदा पूंछ जिल्ह्यात दिसला होता. तेव्हापासून लष्कर आणि पोलीस त्याच्या मागावर होते.

अबू झरारचा खात्मा हे सुरक्षा दलांना आलेलं मोठं यश आहे. पूंछ-राजौरी भागामध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया सुरू करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. तसेच, सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करण्याचं टार्गेट त्याला त्याच्या पाकिस्तानातील म्होरक्यांनी दिलं होतं, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे. नियंत्रण रेषेजवळ अर्थात एलओसीजवळ पूंछ-राजौरी भागात खात्मा करण्यात आलेला अबू झरार हा आठवा दहशतवादी आहे. गेल्या महिन्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा गाईड म्हणून काम करणार्‍या हाजी अरिफला कंठस्नान घातले होते.

सुरक्षा दलांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अबू झरारला पीर पंचालच्या दक्षिण भागामध्ये दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी सोपवली होती. तसेच, स्थानिक तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचं देखील काम त्याला सोपवण्यात आले होते. अबू झरार आणि त्याचे साथीदार गेल्या काही महिन्यांपासून जंगलांमध्ये लपत छपत सुरक्षा दलांना चकवा देत होते. पण अन्न, कपडे आणि संपर्क करण्यासाठी त्यांना नागरिकांशी संपर्क करावाच लागला. त्यातूनच त्यांचा सुगावा लागला.

Exit mobile version