मुलानेच फसवणूक केल्याचा आईचा आरोप

आई आणि बहिणीचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण

। पनवेल । प्रतिनिधी ।

वडिलोपार्जित जमीन मिळकतीची मृत्यू पत्राद्वारे जाणीवपूर्वक चुकीची वारस नोंद करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा, या मागणीसाठी 80 वर्षीय पार्वती मांडवकर आणि त्यांची मुलगी सुवर्णा भोवाड यांनी मंगळवारी (दि.2) पनवेलमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले. या आंदोलना ठिकाणी नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी भेट दिली, असून आंदोलकांच्या तक्रारीची दखल घेणार असल्याचे आश्‍वासन दिले. मात्र जोपर्यंत लेखी आश्‍वासन दिले जात नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्या सुवर्णा भोवड यांनी दिला आहे.

नेरे येथील नारायण मांडवकर यांना कुळ कायद्याने जमीन मिळाली. त्यांच्या मृत्यूनंतर ती जमीन शंकर मांडवकर यांना मिळाली. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीवर बहिणींची नावे लागणे अपेक्षित आहे. मात्र मृत्यू दरम्यान सदरची जमीन त्यांच्या नातवाच्या नावे हस्तांतरित करण्यात आली. या विषयासंदर्भात कायदेशीर वारसांनी हरकती नोंदवल्या आहेत. तसेच हे प्रकरण तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून समजावून सांगितले होते. मात्र जाणीवपूर्वक, हेतू पुरस्कर त्यांनी हा बनाव केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. विशेष म्हणजे ही जमीन कॉरिडॉरमध्ये संपादित होत असल्याने याचे करोडो रुपये येणार आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आजपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. सदरची फेरफार नोंद तातडीने रद्द करण्यात यावी, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच मंडळ अधिकारी यांच्या निर्णयाला त्वरित स्थगिती द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. याबाबत उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Exit mobile version