सुतारवाडीतील फार्म हाऊसवरील घटना; आजारपणाच्या नैराश्यातून टोकाचे पाऊल
| रोहा | प्रतिनिधी |
आजारपणाच्या त्रासाला कंटाळून फार्म हाऊसवर काम करणाऱ्या मायलेकांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातील सुतारवाडी भागातील खिलारे फार्म हाऊस येथे शनिवारी (दि.3) घडली. विहिरीत मायलेकाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मनिषा काशिकर (80) आणि मंदार काशिकर (43) अशी मृत मायलेकांची नावे असून, दोघेही मूळचे पुणे येथील रहिवासी आहेत. शनिवारी सकाळी खिलारे फार्म हाऊसमधील विहिरीत दोघांचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी महेश सानप यांच्या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू पथकाची मदत घेतली. पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विहिरीच्या पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. तसेच विहिरीच्या शेजारी महिला व पुरुषांच्या चपला आढळून आल्याने महिलेच्या मुलाचाही विहिरीत शोध घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार रेस्क्यू पथकाने विहिरीत शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर मंदार काशिकर यांचाही मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली.
मायलेकांना काही आजार जडले होते. सतत आजारी पडत असल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे सुतारवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास कोलाड पोलीस करीत आहेत.







