मुलांच्या शिक्षणासाठी आई बनली चोर

। कल्याण । प्रतिनिधी ।

पतीने चार मुलांसह वार्‍यावर सोडून दुसरे लग्न केल्याने मुलांचा उदरनिर्वाह व शिक्षण कसे करायचे, असा सतत भेडसावणारा प्रश्‍न एका आईला सतावित होता. मात्र, यावर उपाय शोधीत झटक्यात पैसे मिळतील या हेतूने तिने चोरीला प्राधान्य दिले. मात्र, चैन स्नॅचिंग प्रकरणात पोलिसांच्या ती हाती लागल्याची घटना कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये उघडकीस आली आहे.

औरंगाबाद येथील एका महिलेला तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी पतीने तिच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेऊन दुसरे लग्न केले होते. सुरुवातीच्या काळात हाती लागेल ते काम करू लागली. मात्र, दरम्यानच्या काळात ती आजारी पडली उपचाराकरिता ती मुंबईत आली आणि उपचार सुरू ठेवले. कल्याणच्या विठ्ठलवाडी येथे या महिलेचा भाऊ राहत असल्याने या ठिकाणी तिचे येणे-जाणे सुरू होते.

यादरम्यान बारावीत शिकणार्‍या तिच्या मुलाने कॉलेजची फीची पूर्तता न केल्यास कॉलेजमधून काढून टाकण्याचे सांगितले. मात्र, फीचे पैसे कसे जमवायचे अशा विचारात असता कल्याण-शहाड रेल्वे स्टेशन दरम्यान गर्दीचा फायदा घेत एका महिलेची चैन लंपास करीत विठ्ठलवाडीला गेली. चैन लांबविल्याने महिलेने रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना तोंडाला स्कार्फ घातलेली महिला निदर्शनास आली. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या महिलेच्या घरापर्यंत कल्याण रेल्वे पोलीस पोहोचत पोलीस पथकाने त्या महिलेला ताब्यात घेतले. महिलेला अटक केल्यानंतर चोरलेली चैन पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी तसेच उदरनिर्वाह करिता आपण चोरीचा मार्ग अवलंबिला असल्याचे तिने सांगितल्याने पोलिसही गहिवरले. पैशांकरता मुलांच्या शिक्षणामध्ये अनियमितता पडू नये याकरिता या महिलेने चोरीचा अवलंब केला होता. या महिलेने सहा ते सात चोर्‍या केल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली आहे. कल्याण रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version