। नागोठणे । वार्ताहर ।
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे गेली दोन वर्षे खंडित झालेला नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या देवतांचा चैत्र पालखी सोहळा रविवारी (दि.17) सकाळी 9.30 वा. देवीचे भक्त मधुकर पोवळे यांच्या हस्ते देवीचे मुखवटे विधीवतपणे पालखीत विराजमान केल्यानंतर जोगेश्वरी मंदिरातून मोठ्या उत्साहात सुरु झाला. त्यानंतर पालखी सोहळा ग्रामपंचायत कार्यालय मार्गे बंगलेआळी, कोळीवाडा भागाकडेकडे मार्गस्थ झाला. हा पालखी सोहळा ग्रामस्थांना दर्शनासाठी नागोठण्यातील सर्व भागांतून नेण्यात येणार आहे.
श्री जोगेश्वरी मातेच्या या पालखी सोहळ्यात जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाई टके, राजिप माजी सदस्य किशोर जैन, हरेष काळे, विलास चौलकर, उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, माजी अध्यक्ष बाळासाहेब टके, डॉ. राजेंद्र धात्रक, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, पत्रकार राजेश पोवळे, सुरेश कामथे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदींसह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते.







