माता न तू वैरिणी

एक लाख रुपयांसाठी आईने मुलाला विकले
आारोपीसह मुलाला घेतले ताब्यात

। पनवेल । वार्ताहर ।
माता न तू वैरिणी या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार वर्षाच्या मुलाला विकल्यानंतर आईने पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती उघड झाली. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना झाली, परंतु सदर मुलाला पळवून नेणारे दाम्पत्य हे पनवेल तालुक्यातील बोर्ले या गावात वास्तव्यास असल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता अथक परिश्रम करून अवघ्या 2 तासात सदर मुलाला आरोपींसह ताब्यात घेवून त्यांना कोथरुड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.


रेश्मा सुतार आणि तक्रार करणारी प्रियंका पवार यांच्या संगनमत व कट करुन चिमुकल्याचे अपहरण केले. हा मुलगा तुकाराम निंबळे, मावळ याच्या मध्यस्थीने पनवेल तालुक्यातील बोर्ले गावात राहणार्‍या चंद्रकला माळी आणि भानुदास माळी यांना एक लाख रुपयांना विकला. पोलिसांनी तात्काळ या दोघांचा शोध घेतला. पनवेल तालुका पोलीस पथकाने त्या ठिकाणी पाठवून चंद्रकला माळी आणि भानुदास माळी या दोघांना ताब्यात घेत मुलांबाबत विचारपूस केली. हा मुलगा एक लाख साठ हजार रुपयांना दिपक म्हात्रे यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी जावून आरोपीला ताब्यात घेतले अन् मुलाची सुटका केली. आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असतान 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

Exit mobile version