। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव – मोर्बा रस्त्यावर एच.पी.पेट्रोल पंपाच्यापुढे युनिकोर्न मोटार सायकलची सायकलस्वारास पाठीमागून जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाला. सदरील अपघाताची घटना सोमवार दि.२९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद शौकत युनूस रोहेकर (वय – ६२) रा.राऊत मोहल्ला,मोर्बा ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघातातील मयत उमर उस्मान राऊत (वय -६५) (रा.मोर्बा,ता.माणगाव) हे सायकलवर कामावरून घरी जात होते. त्यावेळी त्यांचा पाठीमागून माणगाव बाजूकडून मोर्बा बाजूकडे येणारे आरोपी खालीद अहमद अब्दुल रशीद खान (वय – ४९) (रा.मोर्बा,ता.माणगाव) हे त्यांचा युनिकोर्न मोटार सायकल (एम.एच.०६ सी.एच.६०३१) या गाडीवरून त्यांच्या मुलास पाठीमागे बसवून अतिवेगाने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सदरची मोटार सायकल चालवीत जात होते. त्यावेळी त्यांनी मयत सायकलस्वार उमर राऊत यांना पाठीमागून धडक दिली. सदर अपघातात मयत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात आतिफ अब्दुल्ला खालिद (वय – १७) (रा.मोर्बा,ता.माणगाव) हे जखमी होऊन मोटार सायकलचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात मोटार फेटल अपघात गुन्हा रजि. नं.३२७/२०२५ भा.न्या.सं.कलम १०६(१),१२५ अ,१२५ ब,२८१ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात येऊन मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्त बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंदार लहाने हे करीत आहेत.
मोटार सायकलची सायकलीला धडक; सायकलस्वाराचा मृत्यू
