। माणगाव । सलीम शेख ।
माणगावजवळ मोर्बा-देगावकोंड रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या दुचाकीची पाठीमागून धडक लागल्याने पादचार्याचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि.5) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद महेश रमेश शेलार (वय 44) रा.देगाव ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी आकाश सीताराम पालकर (वय 25) रा.दहिवली कोंड ता.माणगाव याने त्याच्या ताब्यातील पल्सर दुचाकी क्र.एमएच 01 एक्यू 8442 या गाडीवर पाठीमागे दोन इसमांना बसून भरधाव वेगात जात होता. यावेळी मोर्बा बाजूकडून देगावकोंडकडे पायी चालत जात असलेल्या रमेश गणपत शेलार (वय-64) यांना त्याने पाठीमागून धडक दिली. या अपघातात रमेश शेलार यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक आकाश पालकर यांच्यासह रमेश दगडू काळोखे (वय 30), सुभाष तुकाराम शिंदे (वय 50) सर्व रा.दहिवली कोंड ता.माणगाव हे तिघे जखमी झाले. या अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी तातडीने अपघात ठिकाणी भेट दिली. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाटवे हे करीत आहेत.