| रेवदंडा | वार्ताहर |
रेवदंडा येथे सकाळी ठिकठिकाणी ध्वजवंदन व विशेष कार्यक्रम पार पडले. त्यानंतर रेवदंडा मित्रमंडळाच्या वतीने मोटारसायकल व तिरंगा रॅली काढण्यात आली. रेवदंडा येथे सकाळी ग्रामपंचायत, पोलीस, शाळा, हायस्कूल, अर्बन बँक, आगरकोट किल्ला आदी ठिकाणी ध्वजवंदनासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी अकरा वाजता रेवदंडा मित्रमंडळाच्व्या वतीने मोटारसायकल व त्यानंतर तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी रेवदंडा पोलीस ठाणे इन्चार्ज पो.नि. अशोक थोरात व पोलीस कर्मचार्यांनी या रॅलीत सहभागी होऊन आनंद साजरा केला.

प्रारंभी रेवदंडा मित्रमंडळाच्या वतीने रेवदंडा मोठे बंदर ते चौल येथेपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ‘भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम्’ आदी घोषणांनी रेवदंडा ते चौल बाजारपेठेतील रस्ता दणाणला. वीस मीटर लांबीचा ध्वज हाती घेऊन रॅली काढण्यात आली होती. यावेळी ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून, तर काहींनी घराच्या गॅलरीतून तिरंगा रॅलीवर फुलाचा वर्षाव केला. रेवदंडा पारनाका येेथे रॅलीचे आगमन झाल्यावर भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम् आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी रेवदंडा पोलिस ठाण्याचे पो.नि. अशोक थोरात यांनी संबोधीताना युवावर्गाच्या राष्ट्रप्रेमाचे कौतुक केले. शेवटी राष्ट्रगीताचे गायन होऊन तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली.
या रॅलीत पो.नि. अशोक थोरात व कर्मचारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तर अमित म्हात्रे, निलेश खोत, योगेश पीटनाईक, संदीप खोत, संतोष मोरे, राजू चुनेकर, आदींनी परिश्रम घेतले.