डोंगरी पर्यटनाला चालना मिळावीः आ. जयंत पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्याच पध्दतीने डोंगरभागात पर्यटन वाढीला चालना मिळाली पाहिजे. जेणेकरून येथील स्थानिकांना यातून रोजगाराचे साधन मिळेल असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले.

अलिबाग तालुक्यातील मोरोंडे येथे श्रीराम मंदिर जिर्णोध्दार सोहळा बुधवारी (दि.17) पार पडला. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. यावेळी शेकाप जिल्हा आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य मधु पारधी, पंचायत समिती माजी सदस्य सुभाष वागळे, बोरघरचे माजी सरपंच मधुकर ढेबे, रामराजचे माजी सरपंच मोहन धुमाळ, अलिबाग पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रात वार्डे, कुरुळ ग्रामपंचायत सदस्य अवधूत पाटील, महिला आघाडीच्या सदस्या नागेश्वरी हेमाडे, उत्तम रसाळ, धर्मा लोभी, रामचंद्र गुंड, यशवंत भगत, रमेश गुंड तसेच ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आ. जयंत पाटील म्हणाले, गावांतील मंदिर अतिशय सुंदर बांधले आहे. अलिबाग तालुक्यातील प्रत्येक गाव सुशोभीत व सर्व सोयी सुविधांयुक्त असले पाहिजे. त्या दृष्टीकोनातून ग्रामस्थांनी काम केले पाहिजे. ग्रामस्थांनी एकोपा ठेवला पाहिजे. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. वर्षाला दहा लाखापेक्षा अधिक पर्यटक पर्यटन स्थळी भेटी देतात. पावसाळी पर्यटनदेखील वाढू लागले आहे. डोंगर भागातील पर्यटनालादेखील महत्व वाढत आहे. त्यानुसार डोंगर भागामध्ये पर्यटन अधिक चांगले कसे होईल याकडे ग्रामस्थांनी लक्ष दिले पाहिजे, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.


Exit mobile version