श्रीवर्धनमध्ये मोकाट घोड्यांचा संचार

शेतकऱ्यांसह नागरिक त्रस्त नगरपरिषद प्रशासन हतबल

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन शहरात सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पर्यटकांची संख्या खूप कमी झालेली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरती असणाऱ्या घोडा गाड्या किंवा घोड्याची सवारी करणाऱ्या घोड्यांना सध्या काम नसल्याने मोकाट सोडून देण्यात आलेले आहे. घोड्यांच्या मुक्तसंचारामुळे शहरातील नागरिक त्याप्रमाणे शेतकरी, बागायतदार प्रचंड प्रमाणात त्रस्त झाले आहेत. एका वेळेला पंधरा ते वीस घोड्यांचा कळप नारळ, सुपारीच्या वाड्यांमध्ये घुसतो व त्या ठिकाणी असलेल्या झाडांचे नुकसान करतो. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी असलेल्या भात शेतीमध्ये देखील घोडे घुसत असून शेतीचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही वर्षांपूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेकडे कोंडवाडा उपलब्ध होता. त्यामुळे पकडून आणलेले घोडे किंवा गुरे कोंडवाड्यात ठेवली जात असत. संबंधित प्राण्यांचा मालक आल्यानंतर त्याच्याकडून रीतसर दंड वसूल केला जात असे. त्याची त्याला पावती देखील दिली जात असे व त्यानंतरच पकडलेली गुरे किंवा घोडे यांना सोडण्यात येत असे. परंतू नगरपरिषदेने कोंडवाड्याच्या जागी पर्यटक निवास बांधल्याने कोंडवाडा रद्द बातल निघाला आहे. त्यामुळे घोडे पकडले तर ठेवायचे कुठे हा प्रश्न नगरपरिषद प्रशासनासमोर आहे. सदर घोडे हे उनाड फिरत असल्यामुळे ते अनेक ठिकाणी आपली विष्ठा टाकत असतात. त्यामुळे परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरते.

सदर मोकाट घोड्यांचे मालक नगरपरिषद हद्दीमध्ये राहत नसून शहराला लागून असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहतात. तसेच काही रानवली या गावी राहतात. एखाद्या घोड्याला पकडून सदर मालकांसमोर हजर केल्यानंतर हा घोडा माझा नाही, असे म्हणून हात झटकून टाकतात. परंतु काही दिवसांपूर्वी एकाने एक पिकप जीप आणून त्यामध्ये घोडे भरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेला माझा घोडा नाही म्हणणारे अनेक मालक समोर आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी अनेक वेळा या घोडामालकांना बोलावून समज दिली होती. त्याचप्रमाणे श्रीवर्धन पोलीस ठाण्याने देखील सदर घोडा मालकांना समज दिली होती. परंतु घोडा मालकांकडून घोडे मोकाट सोडण्याचे काम सुरूच असल्याचे दिसत आहे. अनेक वेळा हे खोडे जोरजोरात किंकाळ्त, धावत सुटतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी किंवा बाजारपेठेत नागरिकांमध्ये व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. तरी नगरपरिषदेने सदर मोकाट घोडा मालकांवरती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावे. अशी मागणी श्रीवर्धन शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version