। श्रीवर्धन । वार्ताहर ।
गेल्या अनेक वर्षांपासून श्रीवर्धन शहरामध्ये मोकाट फिरणार्या घोड्यांचा त्रास श्रीवर्धन शहरातील बागायतदारांना व शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. मोकाट फिरणारे घोडे बागायतदारांच्या बागांमध्ये जाऊन केळीच्या पिकाचे व अन्य पिकांचे नुकसान करतात. त्याचप्रमाणे शेतकर्यांनी आपल्या शेतामध्ये भात कापणी झाल्यानंतर पेरलेला वाल, चवळी, उडीद इत्यादी पिकेदेखील खाऊन फस्त करत असल्यामुळे ेतकरी घोड्यांच्या उच्छादला कंटाळलेले आहेत.
श्रीवर्धन शहरामध्ये जसे जसे पर्यटन वाढत आहे, तसेच समुद्रकिनार्यावरती घोडा गाड्या, घोड्याची सवारी इत्यादी प्रकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. घोडा गाडी व घोड्यांची सवारी याचा धंदा करणारे लोक दिवसभर घोड्यांकडून काम करून घेतात. पैसे खिशात मिळाले की घोडे मोकाट सोडून आपल्या घरी निघून जातात, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत श्रीवर्धन नगर परिषदेकडे अनेक वेळा विनंती अर्ज व निवेदने देण्यात आली. प्रत्येक वेळी नगरपरिषदेकडून बोलाचाच भात, बोलाचीच कढी म्हणीच्या उक्तीप्रमाणे घोड्यांच्या मालकांवरती कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येते. तसेच ज्या मालकांचे घोडे आहेत, त्या घोड्यांना टॅगदेखील करण्यात येईल, अशा प्रकारची आश्वासने मिळाली. परंतु, अद्यापपर्यंत कोणत्याही घोडेमालकावर कारवाई करण्यात आलेली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
समुद्रकिनारी घोड्यांचा धंदा करणारे जे धंदेवाईक आहेत, यापैकी शहरातील एकही नागरिक नाहीत. सर्व श्रीवर्धन शहराच्या बाहेरील आहेत. परंतु सदर धंदेवाल्यांचा त्रास श्रीवर्धन शहरातील नागरिकांना सहन करावा लागतोय. घोडा गाडी किंवा घोड्यांची सवारी करणार्या धंदे मालकांकडून जर का घोडे मोकाट सोडण्याबाबत सूचनांचे पालन होत नसेल, तर नगरपरिषदेने व श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडून सदरचे धंदे समुद्रकिनारी बंद करावेत, अशी मागणी शहरातील नागरिक, बागायतदारांसह शेतकर्यांकडून केली जात आहे.