। उरण । प्रतिनिधी ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने गेली 4 ते 5 वर्षे सातत्याने आवाज उठविला आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कमिटीने अनेक संप, आंदोलने व अनेक बैठका घेतल्या आहेत. प्रशासनाशी पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतु, सिडको महामंडळाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने या कमिटीच्या पदाधिकार्यांनी सोमवारी (दि.7) सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी (दि.9) आंदोलनाचा तिसरा दिवस असून अद्यापही प्रशासनाने आंदोलनाची कोणतेही दखल घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्त व कमिटीचे पदाधिकारी सदस्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष विशाल भोईर, अखिल भारतीय किसान सभा रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, सचिव संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगुणा डाकी, किरण केणी, प्रवीण मुत्तेमवार यशवंत भोपी आदी विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त आंदोलनाला बसले आहेत.