मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी राजे आक्रमक

। नांदेड । वृत्तसंस्था ।
मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांनी बसावे माझ्यासमोर, होऊन जाऊ द्या चर्चा, असं आव्हानच खासदार संभाजी छत्रपती यांनी दिले आहे.

नांदेडमध्ये मराठा समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.या मोर्चाला संबोधित करताना संभाजी छत्रपती यांनी हे आव्हान दिले. केंद्राने 127 वी घटना दुरुस्ती केली आहे. राज्याला ओबीसी प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार दिल्याचे केंद्राने सांगितले. आरक्षण देण्याचे अधिकार दिले. पण आरक्षण द्यायचं कुठून? इंद्रा सहानी केसने हात बांधले आहेत. त्याला एकच पर्याय आहे, आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही घटना दुरुस्ती केली पाहिजे.

केंद्राने केंद्राची जबाबदारी पार पाडावी. त्यांनी दुरुस्ती करावी. दूरवर आणि दुर्गम हा बदल करून भौगोलिक परिस्थितीचा मुद्दा टाकावा. नाही तर मग 50 टक्क्यांची कॅप बदला. तर राज्याने मराठा समाजाला मागास घोषित केले पाहिजे. ही केंद्र आणि राज्याची जबाबदारी आहे. त्यावर बोला. वन टू वन चर्चा करायला मी तयार आहे. बोलवा सर्वांना. मराठा समाजाच्यावतीने मी बोलेन. मी वकील नाही. पण माझी भाषा वकिलासारखी आहे. केंद्र आणि राज्याचे लोकं येऊ द्या. मी समोर बसतो. होऊ द्या चर्चा, असं आव्हान संभाजी छत्रपती यांनी दिले.

Exit mobile version