आश्वासनांचा विसर पडल्याने नाराजी; लांब पल्ल्याच्या गाड्यांना रोह्यात थांबा
। पेण । प्रतिनिधी ।
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खा. सुनील तटकरे यांनी पेण तालुक्यात झालेल्या जाहीर सभांमध्ये पेणला लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी प्राथमिकता देऊन प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. परंतु, जेव्हा लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची वेळ आली, तेव्हा खा. तटकरे यांनी पेणकरांना सावत्र वागणूक देत लांब पल्ल्याच्या गाड्या रोहा रेल्वे स्थानकावर थांबविण्यासाठी प्राधान्य दिले. खा. तटकरेंना आश्वासनांचा विसर पडल्याने पेणकरांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि गणपती बाप्पा निर्मितीचे केंद्र म्हणून पेण शहराची जगाच्या पाठीवर ओळख आहे. गेली कित्येक वर्षे पेणकर संघर्ष करत आहेत की, पेणला लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा. परंतु, आजही पेणकरांची ही इच्छा पूर्ण झालेली नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत खा. तटकरेंनी पेण तालुक्यात झालेल्या जाहीर सभांमध्ये पेणकरांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. पेणकरांनीसुद्धा त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून भरभरून मतदान केले. थोडे थोडके नाही तर 47 हजारांचे मताधिक्य पेणकरांनी सुनील तटकरे यांना दिले. परंतु, जेव्हा लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची वेळ आली, त्या वेळेस ‘फावडे आपल्याच अंगावर माती ओढते’ या म्हणीप्रमाणे खा. सुनिल तटकरे यांनी पेणकरांना सावत्र वागणूक देत लांब पल्ल्याच्या गाड्या रोहा रेल्वे स्थानकावर थांबविण्यासाठी प्राधान्य दिले.
त्यानुसार यापुढे लोकमान्य टिळक मडगाव एक्स्प्रेस, कोचुवेली चंदीगड केरळा संपर्क क्रांती एक्स्प्रेस, कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस, हिसार-कोयंबतूर एसी एक्स्प्रेस आणि दादर-तिरूनेलवेली एक्स्प्रेस या गाड्या रोहा रेल्वे स्थानकात थांबणार आहेत.
मताधिक्य पेणकरांनी द्यायचे आणि सोयीसुविधा रोहेकरांना द्यायच्या, ही बाब पेणकरांना न पटल्यामुळे पेणकरांच्या मनात खा. सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी निर्माण झाली आहे.







